Mandana Karimi Leaves India After 16 Years: भारतात (India) जवळपास 16 वर्ष वास्तव्य केल्यानंतर, अभिनेत्री मंदाना करीमी (Actress Mandana Karimi) हिनं आता देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर अचानक समोर आलेल्या या वृत्तानं तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तिनं तिच्या चाहत्यांसोबत इन्स्टाग्राम हँडलवर एक Ask Me Anything सेशन घेतलेलं, त्यादरम्यान, मंदाना करीमी हिनं विमानतळावरून एक व्हिडीओ शेअर केला आणि आपण भारताचा निरोप घेत असल्याचं जाहीर केलं.

Continues below advertisement

मूळची इराणची असलेली अभिनेत्री मंदाना करीमी (Iranian Actress Mandana Karimi) हिनं आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण निर्णय घेत असल्याचं नमूद केलं. अभिनेत्रीनं सांगितलं की, भारत तिच्यासाठी 'दुसरं घर' बनलं होतं, पण आता ती एका नव्या प्रवासाच्या दिशेनं, नव्या सुरुवातीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. अभिनेत्री मंदानाच्या या घोषणेनंतर, सोशल मीडियावर लोक तिच्या या निर्णयावर चर्चा करत असून अनेक चाहते आपल्या भावूक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेला एक मोठा निर्णय (Iranian Actress Mandana Karimi Decision)

मंदाना करीमी हिनं यापूर्वीच आपण भारत सोडून जाण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले होते. या वर्षाच्या सुरुवातीला NDTV ला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना तिने उघड केलेलं की, सुरक्षेसंबंधीच्या चिंतेमुळे ती देश सोडून जाण्याचा निर्णय घेत आहे. जरी तिनं याविषयीचे विशिष्ट तपशील देण्यास नकार दिला असला, तरी तिनं असं नमूद केलंय की, इराणशी संबंधित मुद्द्यांवर उघडपणे भाष्य केल्यामुळे आणि तेथील प्रशासनावर टीका केल्यामुळे तिला सातत्यानं मोठमोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता.

Continues below advertisement

अभिनेत्री मंदाना करीमी म्हणाली की, मी कित्येक वर्षांपासून आपले लोक आणि इराणच्या समर्थनात आवाज उठवतेय. त्यांनी हेसुद्धा म्हटलंय की, आता भारतात राहणं त्यांच्यासाठी आधीसारखं राहिलेलं नाही. मंदाना हिनं मुलाखतीत बोलताना हेसुद्धा स्वीकार केलेलं की, तिला बऱ्याच काळापासून धमक्या मिळत आहेत. जेव्हा तिला विचारण्यात आलं की, खरंच तुला जीवेमारण्याच्या धमक्या मिळालेल्या? त्यावर बोलताना तिनं उत्तर दिलेलं की, "नेहमीच..."

"भारत आता घरासारखा भासत नाही..." (Mandana Karimi Leaves India)

मंदाना करीमी हिनं असंही नमूद केलेलं की, या कठीण काळात तिला कोणाकडूनही विशेष असा पाठिंबा मिळाला नाही. तिनं हेदेखील उघड केलं की, ना तिच्या मित्रांनी, ना सरकारनं आणि ना प्रसारमाध्यमांनी, कोणीही तिला अपेक्षित असलेला पाठिंबा दिलेला नाही. या अभिनेत्रीच्या मते, हेच ते कारण आहे. ज्यामुळे आता तिला भारत आपले 'घर' वाटत नाही. अत्यंत भावूक स्वरात मंदनानं म्हटलं की, तिनं जे काही केलं, ते सर्व आपल्या मातृभूमीसाठी, म्हणजेच इराणसाठी, तिथल्या लोकांसाठी आणि स्वतःच्या संघर्षासाठी केलं होतं. तिनं पुढे असंही जोडलं की, जर तिला पुन्हा एकदा संधी मिळाली, तर कोणाचा पाठिंबा मिळो वा न मिळो, ती पुन्हा तोच मार्ग निवडेल. 

अभिनेत्री मंदाना करीमी हिच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, मंदाना करीमी शेवटची 'थार' (Thar) सिनेमात दिसलेली. या सिनेमात अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. आता, मंदना आपल्या या नव्या देशात आणि नव्या आयुष्यात पुढे काय करणार आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

कोण आहे मंदाना करीमी?

19 मे 1988 रोजी तेहरान (इराण) इथे जन्मलेल्या मंदाना करीमी हिचे वडील रेजा करीमी भारतीय तर आई सबा करीमी इराणी वंशाच्या आहेत. सुरुवातीला तिनं एअर होस्टेस म्हणून काम केलं, पण नंतर मॉडेलिंगसाठी करिअरची दिशा बदलली. 2010 साली ती मुंबईत आली आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम सुरू केलं.

2015  मध्ये Roy या सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये कॅमिओ केलेला. त्याच वर्षी ती Bigg Boss 9 मध्ये झळकली आणि सेकंड रनर-अप ठरली. या शोमुळे ती घराघरांत पोहोचली. पुढे भाग जॉनी , 'क्या कुल है हम 3' आणि 'में और चार्ल्स' यांसारख्या सिनेमांत तिनं काम केलेलं. 2017 मध्ये तिनं गौरव गुप्ताशी लग्न केलं. मात्र काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Dua Lipa Sued Samsung For Publicity Rights Copyright: सुप्रसिद्ध गायिकेमुळे सॅमसंग कंपनीच्या अडचणी वाढल्या; फक्त फोटोमुळे ठोकला 143 कोटींचा दावा, नेमकं प्रकरण काय?