Malti Chahar Reaction on Pranit More Controversy: स्टँडअप कॉमेडियन आणि ‘बिग बॉस’19 चा माजी स्पर्धक प्रणित मोरेची (Pranit More) सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे. बिर्याणी प्रकरणामुळे सोशल मीडियावर प्रचंड टीका आणि ट्रोलिंग झाल्यानंतर त्याने माफीनामा प्रसिद्ध केला. नंतर थेट स्वतःचे इन्स्टाग्राम अकाउंट बंद केलं. त्याच्या शोमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेल्या हिमांशू जांगरा नावाच्या व्यक्तीने महिलांबाबत आक्षेपार्ह आणि असभ्य वक्तव्य केले होते. या सगळ्या प्रकरणावर आता बिग बॉसच्या घरातील प्रणित मोरेची जवळची मैत्रीण अभिनेत्री मालती चहर (Malti Chahar) चांगलीच संतापलीय. x माध्यमावर पोस्ट करत तिने पेद्दी चित्रपट आणि बिर्याणी प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. विशेष म्हणजे या प्रकरणावर बोलताना तिने प्रणीत मोरेचं नाव घेणं टाळलं.

Continues below advertisement

मालती चाहर नेमकं काय म्हणाली?

प्रणित मोरे आणि मालती चाहर हे दोघेही ‘बिग बॉस 19’मध्ये एकत्र सहभागी झाले होते. मालतीने बुधवारी एक्सवर 370 रुपयांच्या बिर्याणी प्रकरणावर आपला संताप व्यक्त केला. तसेच तिने राम चरणच्या ‘पेद्दी’ चित्रपटाचाही यात उल्लेख केला.

मालतीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, "370 रुपयांची बिर्याणी आणि ‘पेद्दी’ या गोष्टी तुम्हाला जाणवून देतात की अनेक महिला लग्न करण्याबाबत साशंक का असतात. आम्ही आमच्या स्वातंत्र्याला इतके महत्त्व का देतो आणि बिल स्प्लिट का करतो. काही महिला तर पुरुषांना आर्थिकदृष्ट्याही पूर्णपणे मदत करत आहेत. तरीही महिलांकडे वस्तूप्रमाणे पाहिले जाते आणि एका महिलेची संमती ही जणू एका प्लेट बिर्याणीपेक्षाही कमी मोलाची समजली जाते."ती पुढे म्हणाली, "समानता, आदर आणि सन्मानासाठी अनेक पिढ्यांपासून संघर्ष केल्यानंतरही आज आपण अजूनही अशाच मानसिकतेचा सामना करत आहोत, ही अत्यंत निराशाजनक बाब आहे."

Continues below advertisement

‘मुलांना महिलांचा आदर करायला शिकवा’

मालतीने पुढे आई असलेल्या आणि मातृत्व अनुभवणाऱ्या अनेकीना आवाहन करत म्हटलं, "कृपया आपल्या मुलांना महिलांचा आदर करायला आणि संमतीचे महत्त्व समजून घ्यायला शिकवा."

तिने प्रेक्षकांनाही उद्देशून लिहिलं, "एखाद्या गोष्टीकडे केवळ विनोद म्हणून किंवा फक्त चित्रपट म्हणून पाहून दुर्लक्ष करणे सोपे असते. मात्र,माध्यमं  समाज संस्कृती घडवतात आणि पडद्यावर जे सामान्य वाटू लागते, त्याचे परिणाम महिलांना वास्तविक आयुष्यात भोगावे लागतात. लोक बाजारपेठेच्या गरजेनुसार पैसा कमावतात, पण ग्राहक म्हणून आपलीही जबाबदारी आहे. त्यामुळे आपण कोणाला पाठिंबा देतो आणि प्रोत्साहन देतो, याचा विचार जरूर करा."

नेमकं प्रकरण काय?

प्रणित मोरे (Pranit More) गेल्या काही दिवसांपासून एका वादग्रस्त व्हिडीओमुळे चर्चेत आहे. त्याच्या स्टँडअप शोदरम्यान प्रेक्षकांमधील हिमांशू जांगडा नावाच्या तरुणाने महिलांविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्य केले होते. "370 रुपयांची बिर्याणी खाऊ घातली, आता ते पैसे वसूल करणारच," असे वक्तव्य करत त्याने महिलांबाबतची असंवेदनशील मानसिकता उघडपणे व्यक्त केली. मात्र, या विधानाला तात्काळ विरोध करण्याऐवजी शोचा होस्ट असलेल्या प्रणित मोरेने त्या चर्चेला पुढे चालू ठेवत त्याला जवळपास अर्धा तास व्यासपीठ दिल्याचा आरोप होत आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रणितवर टीकेची झोड उठली आणि अखेर त्याला सार्वजनिकरीत्या माफी मागावी लागली. दरम्यान, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या हिमांशू जांगडाला त्याच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आले असून, त्याच्या इतर काही क्लिप्सही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.