Sanjay Dutt First Look From Doble Ismart : संजय दत्तच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त, आगामी चित्रपट 'डबल iSmart' च्या निर्मात्यांनी त्याचा पहिला लूक समोर आणला आहे.  जो ब्लॉकबस्टर 'iSmart शंकर' चा सिक्वेल आहे. टीमने काही भन्नाट अॅक्शन सीक्वेन्स शूट करून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. पुरी कनेक्ट्स या बॅनरखाली पुरी जगन्नाथ आणि चार्मे कौर निर्मित हा चित्रपट असणार आहे. निर्माते आज एक मोठे अपडेट घेऊन आले आहेत. 'डबल iSmart' मध्ये बॉलिवूड स्टार संजय दत्त हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


संजयचा लूक समोर आला


अभिनेता पहिल्या शेड्यूलमध्येच शूटमध्ये सामील झाला आहे. आज निर्मात्यांनी संजय दत्तच्या पहिल्या लूक पोस्टरचे अनावरण केले. ज्यात त्याची बिग बुलची भूमिका आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये, संजय दत्त सूटमध्ये दिसत आहे. एका क्लासी हेअरस्टाईल आणि मोठ्या दाढीत पोस्टरमध्ये तो दिसत आहे. सोबतच अंगठ्या, महागडे घड्याळ आणि चेहऱ्यावर आणि बोटांवर टॅटू आहे. तो सिगार ओढताना दिसत आहे. संजय दत्त एक दमदार व्यक्तिरेखा साकारत असल्याचे या पोस्टरवरून स्पष्ट होत आहे.






पुरी दिग्दर्शित 'डबल iSmart' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


'डबल iSmart' मध्ये संजय दत्त याआधी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटासाठी काम करण्याचा आपला उत्साह शेअर करताना संजय दत्तने ट्विट केले की,  'दिग्दर्शक पुरी जगन्नाथ जी आणि उस्ताद राम पोथीनेनी यांच्यासोबत काम करणे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. या आगामी 'डबल iSmart' मध्ये बिगबुलची भूमिका साकारताना आनंद झाला आहे. या सुपर-टॅलेंटेड टीमसोबत काम मी करण्यास उत्सुक आहे आणि 8 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची वाट पाहत आहे.'


या दिवशी रिलीज होणारा


हॉलीवूडचा सिनेमॅटोग्राफर जियानी जियानेली या हाय-व्होल्टेज अॅक्शन एंटरटेनरसाठी काम करत आहे. निर्माते लवकरच चित्रपटातील उर्वरित कलाकार आणि क्रू उघड करतील. 'डबल iSmart' 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज होणार आहे.


संजय दत्तचे सर्वोत्कृष्ट सिनेमे कोणते? 


सुनील दत्त दिग्दर्शित 'रॉकी' या सिनेमाच्या माध्यमातून संजयने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. संजयची मुख्य भूमिका असलेला 'नाम' हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमातील 'चिठ्ठी आई है' हे गाणं खूपच लोकप्रिय झालं. महेश भट्ट दिग्दर्शित सडक या सिनेमात संजय मुख्य भूमिकेत होता. त्याचे 'साजन', 'कुरुक्षेत्र' आणि 'मुन्ना भाई एमबीबीएस' हे सिनेमेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.