मुंबई : 'झिम्मा' या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या खास कार्यक्रमाला हजेरी लावली. होळी आणि धुळवडीच्या मुहूर्तावरच या कट्ट्याचं आयोजन केलं गेलं असल्यामुळं इथं गप्पांच्या आणि आठवणींच्या रुपानं बहुविध रंग उधळले गेले.
काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देत निर्मिती सावंत यांनी पुन्हा एकदा उपस्थितांसोबतच प्रेक्षकांची मनं जिंकली. काही दिवसांपूर्वीच एका अभिनेत्रीनं केलेल्या बोल्ड फोटोशूचा संदर्भ देत निर्मिती सावंत यांच्यापुढं तिनं अधोरेखित केलेला बॉडी शेमिंगचा बहुचर्चित मुद्दा ठेवला. यालाच जोड देत तुम्हाला कधी बॉडी शेमिंग किंवा तत्सम अनुभव आला आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
बहुचर्चित मुद्द्यावर उत्तर देत त्यांनी आपण जशा आहोत, अगदी तसंच प्रेक्षकांनी आपल्याला स्वीकारलं आहे त्यामुळं कधीही असा अनुभव आला नाही, असं अतिशय उत्स्फूर्त उत्तर दिलं.
मध्यंतरी एका अभिनेत्रीनं बोल्ड फोटोशूट केलं होतं. या माध्यमातूनबॉडी शेमिंगचा मुद्दा तिनं उचलला होता.याबाबततुमचा काही अनुभव आहे का, असं विचारलं असता माझा असा काहीच अनुभव नाही, असं निर्मिती सांवंत म्हणाल्या. स़डपातळ असतो तर वेगळ्या भूमिका मिळाल्या असत्या असं कधी वाटलं का, असं विचारलं असता याचं उत्तर देत त्या म्हणाल्या, 'बारीक असणाऱ्या अशा कितीतरी अभिनेत्री आहेत, ज्या ते सगळे रोल करु शकतात; माझ्यासारख्या अशा कमीच अभिनेत्री आहेत. त्यामुळं साचेबद्ध भूमिका करु देत की त्यांना, आम्ही जरा वेगळे रोल करतो'.
कलाकारही एक व्यक्तीच आहे. एक अशी व्यक्ती जिला अनेकदा दु:ख लपवून कामाला लागावं लागतं. वेळप्रसंगी चेहऱ्यावर हसूही ठेवावं लागलं. आपल्यालाही अशा कठीण प्रसंगी चेहऱ्यावर हसू ठेवून काम करावं लागल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कट्टावर रंगलेल्या गप्पांमध्ये त्यांनी आपल्या सकारात्मक व्यक्तीमत्त्वाचा पैलू सर्वांसमक्ष ठेवला.
In Pics | पाहा प्रियांकाचं आलिशान रेस्तराँ SONA आणि तेथील भारतीय मेन्यू
'मी फार सकारात्मक आहे, काही गोष्टी घडल्यानंतर त्याचं दु:ख करत राहण्यापेक्षा त्यातून एखादी तरी चांगली गोष्ट आपल्याला मिळते. ती उचलून पुढे जात राहणं मी शिकले', असं त्या म्हणाल्या. 'गंगुबाई'ने खुप दिलं, प्रेक्षकांचा खजिना दिला असं म्हणत असताना या भूमिकेशी असणारा एक बंध सर्वांपुढं आला आणि यातूनच असंख्य आठवणींना उजाळआ मिळाला. दादरपासून ते अगदी थेट खेडच्या एका प्रयोगापर्यंत ही आठवणींची गाडी पहोचली.
मधेच आलेल्या एका थांब्यावर अशोक सराफ यांच्यासोबत रंगभूमीवर काम करण्याच्या आठवणीही या गाडीत स्वार झाल्या. मग काय, निर्मिती सावंत यांनी अशोक मामांसोबत काम करतानाचे अनुभव सर्वांपुढे मांडत एका शिस्तप्रिय कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव काही औरच असल्याचं स्पष्ट केलं. आपल्यासाठी दैवतच असणाऱ्या एका व्यक्तीसोबत रंगभूमीवर कला सादर करणं याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून आला होता. गप्पांच्या ओघात निर्मिती सावंत यांच्या रुपानं सकारात्मक उर्जा जणू सर्वत्रच पसरली गेली होती.