Pune : पुण्यातील (Pune) अप्पर इंदिरा नगरमधील ओटा वसाहतीत राहणाऱ्या 65 वर्षांच्या रंभा पवार यांच्यावर नियतीने बालपणापासूनच आघात केले. येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत जगण्यासाठी असलेल्या संघर्षामुळे आता उतार वयात त्या हतबल झालेल्या आहेत. वयाच्या बाराव्या वर्षी एका अपघातात रंभा बाईंचा एक डोळा कायमचा निकामी झाला. घरच्या गरिबीमुळे काबाडकष्ट करत आई वडिलांनी त्यांचे लग्न लावून दिले. लग्नानंतर वर्षभरात पतीने त्यांना वाऱ्यावर सोडून देत दुसरे लग्न केले. एकट्या पडलेल्या रंभा पवार माहेरी आश्रयाला आल्या. आई वडिलांचा आणि भावाचा आधार मिळाला तरी दारोदार जाऊन जुने कपडे गोळा करून त्या बदली छोटी भांडी देण्याचा व्यवसाय करू लागल्या.एकेदिवशी डोक्यावर ओझं घेऊन ट्रेनमध्ये चढत असताना पाय घसरून त्या खाली पडल्या सुदैवानं जीव वाचला पण शरीराला गंभीर इजा झाल्यामुळे 3 वर्ष त्या चालू शकल्या नाहीत. त्यावेळी भावानं त्यांना खूप जपलं. 


काही दिवसांनी आई वडिलांचे निधन झाले आणि काही वर्षातच पाठोपाठ एकुलता एक हक्काचा आधार असणारा भाऊ पण जग सोडून गेला. आई वडिलांचं घर असलेल्या एका छोट्या खोलीत राहून पोटापाण्यासाठी बाहेर  साफसफाईचे काम रंभाबाई पवार करत असताना आजार उद्भवला. डायबेटिजमुळे शरीर साथ  देत नाही. शरीराप्रमाणे जुन्या मातीच्या घराच्या भिंतीही खचल्या आहेत. छपराचे लोखंडी  पत्रे गंजल्यामुळे पावसाळ्यात  त्यातून पडणाऱ्या पाण्यामुळे संपूर्ण खोलीत पाणी साठते. अशा अवस्थेत न झोपता रात्र त्या जागून काढतात. 


घर दुरुस्तीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चासाठी त्यांच्याकडे पैसा नाही. डोक्यावर नीट छप्पर नाही आता पुढं कसं होणार या चिंतेत असणाऱ्या रंभा बाई पवार यांना मराठी तारका प्रोडक्शनचे निर्माता, दिग्दर्शक महेश टिळेकर आणि त्यांचे मित्र वास्तू शिल्प डेव्हलपरचे नितीन धिमधिमे यांनी मदतीचा हात दिला आहे. रंभा बाई पवार या जेष्ठ महिलेची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या परिस्थीतीची माहिती घेऊन रंभाबाईंना स्वखर्चाने घर बांधून देण्याचा निर्णय महेश टिळेकर आणि नितीन धिमधिमे यांनी घेतला आहे.


हेही वाचा: