County Championship: इंग्लंड येथे सुरु असलेल्या काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय क्रिकेटपटूंचा दबदबा पाहायला मिळतोय. काऊंटी क्रिकेटमध्ये भारताचे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar), नवदीप सैनी (Navdeep Saini) आणि उमेश यादव (Umesh Yadav) खेळत आहेत. वॉशिंग्टन सुंदरला लंकाशायरकडून काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानंतर वॉशिंग्टननं जबरदस्त गोलंदाजी करत नॉर्थम्प्टनशायरच्या फलंदाजांचं कंबरडं मोडून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. नॉर्थम्प्टनशायरविरुद्ध त्यानं 69 धावा खर्च करून चार विकेट्स घेतल्या आहेत. 


नॉर्थम्प्टनशायरविरुद्ध सामन्यात वॉशिंग्टननं व्हिल यंग, रॉब कियो, रियान रिकलेटन आणि टॉम टेलर यांची विकेट्स घेतली. वॉशिंटन सुंदरचं फॉर्ममध्ये परतणं भारतासाठी दिलासादायक गोष्ट आहे. वॉशिंग्टन सुंदरनं गेल्या वर्षी जुलै महिन्यात प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळला होता. त्यानं कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. परंतु, फिटनेसच्या समस्यामुळं तो भारतीय संघाबाहेर आहे. परंतु, वाॉशिंग्टन सुंदरकडं चांगलं प्रदर्शन करून आगामी टी-20 विश्वचषकात भारतीय संघात स्थान मिळवण्याची चांगली संधी आहे. 


पुजाराचं पाचवं शतक
काऊंटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारानं ससेक्सकडून खेळताना मिडलसेक्सविरुद्ध शतक झळकावलं. या हंगामातील त्याचं पाचवं शतक आहे. ज्यात दोन दुहेरी शतकांचा समावेश आहे. मिडलसेक्सविरुद्ध त्यानं 182 चेंडूत नाबाद 115 धावांची खेळी केली आहे. ज्यात 10 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. या काऊंटी क्रिकेट लीगमध्ये चेतेश्वर पुजारा सातत्यानं धावा काढत आहे.


नवदीप सैनी, उमेश यादवची उत्कृष्ट गोलंदाजी
भारताचे वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि उमेश यादव यांच्यासाठी कालचा (मंगळवार) दिवस चांगला ठरलाय. नवदीप सैनीनं 10 षटकात 59 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. उमेश यादवला एकही विकेट्स मिळाली नाही. परंतु, त्यानं 18 षटकात फक्त 44 धावा खर्च केल्या. 


हे देखील वाचा-