Mahesh Anand death mystery : मुंबईतील वर्सोवा परिसर.... यारी रोडवर असलेल्या किनारा अपार्टमेंटमधील एका फ्लॅटचे दोन दिवसांपासून दरवाजे बंद होते. बाहेर साचलेले डब्ब्यांना पाहून शेजाऱ्यांना शंका आली. डबेवाला रोज जेवण ठेवून जात असे, पण भांडी तशीच पडून राहायची. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यावर लोकांना काहीतरी घडल्याची जाणीव झाली आणि तातडीने पोलिसांना बोलावण्यात आलं.
दरवाजा तोडण्यात आला आणि आतलं दृश्य पाहून सगळ्यांचेच धक्कादायक झाले. सोफ्यावर टेकलेल्या अवस्थेत महेश आनंद यांचा मृतदेह सडलेला होता. एका हातात अर्धवट दारूची बाटली, समोर अर्धं खाल्लेलं जेवण आणि त्यावर बुरशी. असं वाटत होतं जणू ते खाताखाता खाली कोसळले. पण प्रश्न असा होता की 80-90 च्या दशकात पडद्यावर लोकांना घाबरवणारा इतका प्रसिद्ध अभिनेता प्रत्यक्ष आयुष्यात इतका एकटा आणि असहाय्य कसा झाला? चला, त्यांची कहाणी जाणून घेऊया…
महेश आनंद कोण होते?
महेश आनंद यांचा जन्म 1961 मध्ये झाला. उंच बांधा असलेले महेश केवळ मार्शल आर्ट्समध्ये फक्त ब्लॅक बेल्ट नव्हते तर मॉडेलिंग आणि डान्सिंगमध्येही पारंगत होते. 1982 मध्ये त्यांना पहिल्यांदा सनम तेरी कसम चित्रपटाच्या गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर होण्याची संधी मिळाली. पहिल्याच चित्रपटात त्यांच्या लुक्स आणि परफॉर्मन्सकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले.
काही वर्षांतच त्यांनी लहान भूमिका करून 1988 मध्ये अमिताभ बच्चनच्या शेहंशाह चित्रपटात गुंडाची भूमिका केली आणि तीच त्यांची खरी ओळख ठरली. त्यानंतर त्यांचा करिअर वेगाने वाढू लागला. गंगा जमुना सरस्वती, तुफान, गुमराह, सस्ती दुल्हन महंगा दूल्हा अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपली छाप पाडली. एक काळ असा आला की वर्षाला 6-8 चित्रपट त्यांच्या वाट्याला येत. गोविंदा, संजय दत्त, अक्षय कुमार, सलमान खान, सनी देओल अशा मोठ्या कलाकारांसोबत त्यांनी जवळपास 300 चित्रपट केले.
वैयक्तिक आयुष्यही वादग्रस्त
त्यांची पहिली पत्नी होती बर्खा रॉय, अभिनेत्री रीना रॉय यांची बहीण. मात्र हे लग्न काही महिन्यांतच मोडलं. दुसरी पत्नी होती मिस इंडिया इंटरनॅशनल एरिका मारिया डिसूझा... त्यांना त्रिशूल नावाचा मुलगा झाला, पण मारिया मुलाला घेऊन विदेशात गेली आणि त्याचं नाव बदलून अँथनी वोहरा ठेवलं. महेश आपल्या मुलाला भेटूही शकले नाहीत. तिसरी पत्नी अभिनेत्री मधु मल्होत्रा, पण हे नातंही फार काळ टिकले नाही. चौथं लग्न 1999 मध्ये उषा बचानी यांच्याशी झालं, पण महेश यांच्या दारूच्या व्यसनामुळे तेही तुटलं. पाचवं आणि शेवटचं लग्न 2018 मध्ये रशियाच्या लाना हिच्याशी झालं. महेश म्हणायचे, लाना हीच त्यांची जगण्याचं खरं कारणं आहे. पण व्हिसाच्या कारणास्तव ती बहुतेक वेळा रशियातच असायची.
अभिनेत्री साहिला चड्ढा यांच्या म्हणण्यानुसार, महेश यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या काळात तब्बल 12 महिलांशी संबंध राहिले होते. काहींसोबत ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही होते.
करिअरमधलं घातक वळण
90 च्या दशकाच्या अखेरीस एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीर अपघात झाला. तीन महिने हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. काम थांबलं आणि इंडस्ट्रीत नवीन चेहरे झळकू लागले. महेश यांना चित्रपट मिळेनासे झाले. याच काळात त्यांच्या सावत्र भावाने तब्बल 6 कोटी रुपयांची फसवणूक केली. जे काही साठवलेलं होतं ते इलाज आणि कर्जात संपलं. ते नैराश्यात आणि आर्थिक संकटात बुडाले. दारू हा त्यांचा आधार बनला, पण हळूहळू हाच मृत्यूचं कारण ठरला.
शेवटची आशा आणि मोठा धक्का
2018 मध्ये त्यांना दोन आनंदाचे क्षण मिळाले – एक म्हणजे लानाशी लग्न आणि दुसरं म्हणजे दिग्दर्शक पहलाज निहलानी यांनी त्यांना गोविंदाच्या रंगीला राजा चित्रपटात रोल दिला. रोल फक्त 6 मिनिटांचा होता. हा चित्रपट जानेवारी 2019 मध्ये प्रदर्शित झाला, पण बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. फक्त 22 दिवसांनी महेश आनंद यांचा मृतदेह त्यांच्या एकाकी फ्लॅटमधून सापडला.
मृत्यू आणि अंत्यसंस्कार
पोस्टमॉर्टेममध्ये मृत्यू नैसर्गिक असल्याचं नमूद करण्यात आलं, म्हणजे आत्महत्या नव्हती. मात्र सर्वात धक्कादायक म्हणजे – त्यांचा मृतदेह दोन दिवस फ्लॅटमध्ये पडून राहिला आणि कुणालाही माहिती मिळाली नाही. अगदी रुग्णालयातही त्यांचा मृतदेह काही दिवस पडून राहिला, कारण कुणी घेऊनच गेलं नाही. शेवटी त्यांच्या रशियात असलेल्या पत्नी लाना हिने मृतदेह ताब्यात घेऊन एकटीनेच अंतिम संस्कार केले.चित्रपटसृष्टीतील काहीजण पोहोचले, पण तेही बातमी माध्यमांतून समोर आल्यावरच...
इतर महत्त्वाच्या बातम्या