Asha Bhosle : गायक आशा भोसले (Asha Bhosle) या हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा लोकप्रिय गायिका ठरल्या, ज्यांनी आपल्या मोहक आवाजाने बॉलिवूडला नवे उंचीवर नेले. पण वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांना फारसं सुख लाभलं नाही. घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी आपल्या बहिणीच्या सेक्रेटरीशी लग्न केलं होतं. आपल्या कारकिर्दीत आशा भोसले (Asha Bhosle) यांनी तब्बल 12,000 हून अधिक गाणी गायली असून, त्यामुळे त्यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. भारतीय संगीतविश्वात आशा भोसले (Asha Bhosle) यांचं नाव उच्चारलं की, लोकांच्या मनात त्यांच्या मधुर सुरांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.

बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण करत त्यांनी 20 हून अधिक भाषांमध्ये गायन करून एक वेगळाच विक्रम रचला. अनेक दशकं त्यांच्या गाण्यांनी संगीतप्रेमींना वेड लावलं. 8 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या आशा भोसले या संगीतपरंपरेत वाढल्या. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर सुप्रसिद्ध गायक होते. मोठी बहीण लता मंगेशकर आधीच एक आघाडीच्या गायिका होत्या, तरीही आशांनी स्वतःचा स्वतंत्र मार्ग निवडला. त्यांनी आवाजात वेगळेपणा आणला आणि विविध प्रकारचं संगीत शिकायला सुरुवात केली. प्रारंभीचा प्रवास सोपा नव्हता.

दीर्घकाळ त्या लता मंगेशकर यांच्या छायेत राहिल्या, पण सातत्यपूर्ण मेहनत आणि कलेच्या जोरावर त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. गझल, कव्वाली, वेस्टर्न, तसेच पारंपरिक हिंदी गाण्यांमध्येही त्यांनी आपली छाप उमटवली. म्हणूनच त्या आजही लोकप्रिय आहेत.

आत्तापर्यंत त्यांनी एक हजाराहून अधिक चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. वयाच्या केवळ 16 व्या वर्षी त्यांनी स्वतःपेक्षा 15 वर्षांनी मोठे असलेल्या गणपतरावांशी विवाह केला. गणपतराव हे लता मंगेशकर यांचे सेक्रेटरी होते. कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता आशांनी त्यांच्याशी लग्न केलं. मात्र हे वैवाहिक जीवन फार काळ टिकले नाही. सासरचं वातावरण त्यांच्यासाठी अनुकूल नव्हतं. त्यानंतर आशांनी महान संगीतकार राहुल देव बर्मन यांच्याशी लग्न केलं. ते त्यांच्यापेक्षा 6 वर्षांनी लहान होते.  आर.डी. बर्मन यांचे देखील हे दुसरे लग्न होते.

हिंदीबरोबरच मराठी, बंगाली, पंजाबी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, उर्दू, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी गायन केलं आहे. त्यांच्या या बहुभाषिक प्रतिभेमुळे त्या सर्वत्र खास ठरल्या. त्यांच्या सुपरहिट गाण्यांची यादी खूप मोठी आहे. पिया तू अब तो आजा, दम मारो दम, चुरा लिया है तुमने जो दिल को, झुमका गिरा रे, ये मेरा दिल, दिल चीज क्या है, ओ मेरे सोना रे, इन आंखों की मस्ती यांसारखी गाणी आजही प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहेत.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Dashavatar Upcoming Marathi Movie: माझ्या मराठीची बोलू कौतुके... न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला मराठी सिनेमाचा भव्य टीझर; परदेशातही 'दशावतार'ची गाज!