Dharmaveer 2 : शिवसेनेचे ज्येष्ठ दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारित 'धर्मवीर' (Dharmaveer) हा सिनेमा 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची देखील घोषणा झाली. पहिल्या भाग प्रदर्शित झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला अभूतपूर्व अशी कलाटणी मिळाली. त्यामुळे हा सिनेमा त्याचसाठी बनवण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर आता दुसऱ्या भागाची घोषणा केल्यानंतर, विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Legislative Assembly) अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे त्याचसाठी हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आल्याचं म्हटलं जातंय.
सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी नुकतच या सगळ्यावर भाष्य केलं आहे. विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर 2 या सिनेमाची घोषणा करण्यात आल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. त्यावरच मंगेश देसाई यांनी प्लॅनेट मराठी ओटीटीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. त्यांनी या सगळ्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
मंगेश देसाईंनी काय म्हटलं?
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सिनेमाची घोषणा केली का? या प्रश्नाचं उत्तर देताना मंगेश देसाई यांनी म्हटलं की, 'असं पहिल्या भागावेळी देखील असंच बोललं गेलं. असं सगळं घडणार होतं, म्हणून धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे भाग 1 आणण्यात आला होता. पण असं काहीच नाहीये. पहिला भागही मागच्या वेळी 22 एप्रिल रोजी आणण्यात आला होता. काम पूर्ण झालं नव्हतं म्हणून तो पुढे ढकलला. माझ्या लोकांनी सांगितलेल्या किस्स्यांचं 72 तासांचं रेकॉर्डिंग आहे. आता त्या एका सिनेमात कसं दाखवायचं. म्हणून तेव्हाच आमचं दुसरा भाग काढायचं हे ठरलं. त्यासाठी माझी आणि प्रवीणची चर्चा देखील झाली की दुसरा भाग करावाच लागेल. पहिल्या भागाचं 4.30 तासांचं शुटींग झालं होतं. त्यातलं तीन तासाचं तुम्ही पाहिलंत उरलेल्या दीड तासाचं करणार काय? त्या दीड तासांमध्ये बरचे चांगले किस्से आहेत जे प्रेक्षकांसमोर यायलाच हवे. '
पुढे त्यांनी म्हटलं की, त्याचवेळी आमचं ठरलं की, 'भाग दोनही शूट करायचा. एका पुरस्कार सोहळ्यावेळी प्रवीण मला म्हणाला की मंगेश दुसऱ्या भागाची रुपरेषा तयार झाली आहे आणि पहिल्या भागातल्या बऱ्याच गोष्टी आपण वापरु शकतो. त्यावेळी मी प्रवीणला म्हटलं की, ती तुला जर ते योग्य वाटत नसेल, म्हणजे तुला असं वाटत असेल की त्या सीनसाठीच आपण पार्ट 2 करतोय, तर मला ह्यात अजिबात रस नाही. ते सीन योग्यरित्या बसत असतील आणि तुझं स्क्रिप्ट असेल तरच ते आपण करुया. त्यामुळे दुसऱ्या भागाची तयारी तेव्हाच सुरु झाली होती.'