Maharashtra Lockdown : राज्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे. शुक्रवारी राज्यात 15,817 रुग्ण वाढले आहेत तर 56 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत शुक्रवारी गेल्या 6 महिन्यातली मोठी रुग्णवाढ झाली. मुंबईत शहरात 1646 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यांसाठी  विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठीची नियमावली नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. 


निर्माते, तंत्रज्ञ, कलावंत, कामगार व चित्रपट क्षेत्राचे विविध सेवा पुरवठादार यांच्यासाठी महत्वाच्या सूचना महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत.   कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे. चित्रीकरण करताना विशेष काळजी घेवूनच चित्रीकरण करावे, असं महामंडळानं म्हटलं आहे. खबरदारी घेतली तरच शूटिंग सुरळीत सुरु राहणार आहे. आपले दुर्लक्ष वा हलगर्जीपणा सरकारला शूटिंग बंदी आणायला प्रवृत्त करेल, असं देखील महामंडळानं म्हटलं आहे. 


काय आहे नियमावली


* जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांची लेखी परवानगी घेवूनच चित्रीकरण करावे.


* चित्रीकरण स्थळी जेवढी शक्य आहे तेवढी कमी टीम ठेवावी.


* सर्वांनी सोशल डिस्ट्नसिंग पाळावे.


* सेटवर सँनिटायझर, टेम्परेचर गन, ऑक्सिमिटर असणे आवश्यक आहे. तसेच याबाबतीत प्रत्येकाची रोज लेखी नोंद ठेवणे आवश्यक आहे.


* आपल्या युनिट मधील कोणाचे जवळचे, शेजारी कोरोना पेशंट असतील तर संबंधित व्यक्तीची कोरोना टेस्ट करुन रिपोर्ट जवळ बाळगावा.


* जास्त दिवस शूटिंग असेल तर सगळ्यांची कोरोना टेस्ट करुन घेणे बंधनकारक आहे.


* शूटिंग साहित्य वरचेवर सँनिटाइज करणे आवश्यक आहे


* तंत्रज्ञांनी, कामगार वर्गाने हँड ग्लोव्हज, फेस शिल्ड वापरावी.


* चहापाणी, नाष्टा, लंच, स्नँक्स व डिनर यासाठी यूज अँन्ड थ्रो परंतु पर्यावरण पूरक साहित्य वापरावे. शक्यतो पँकिंग लंच वा इतर खाद्यपदार्थ वापरावेत.


* अ.भा.म.चि.महामंडळाच्या भरारी पथकातील सदस्य पाहणी करण्याकरीता आले तर त्यांना सहकार्य करावे.