Maha Kumbh Viral Girl Mona Lisa: मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील महेश्वर शहरातील 16 वर्षीय मोनालिसा हिने स्वप्नातही कल्पना केली नसेल की, महाकुंभला आल्यानंतर तिचे आयुष्य बदलून जाईल आणि ती रातोरात इतकी फेमस होऊन जाईल. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ मेळ्यात मोनालिसा तिच्या कुटुंबासह हार विकण्यासाठी आली होती. तिच्या निळ्याशार डोळ्यांनी लाखो लोकांची मने जिंकली. मोनालिसाचे फोटो इतके व्हायरल झाले की, महाकुंभला आलेले लोक, वृत्तवाहिन्या आणि यूट्यूबर्सनी तिची मुलाखत घेतली. यावेळी चित्रपट निर्माते सनोज मिश्रा यांचीही नजर मोनालिसावर गेली आणि ते तिला आणि तिच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी महेश्वरला पोहोचले. नंतर त्यांनी महाकुंभची व्हायरल गर्ल मोनालिसा हिला त्यांच्या आगामी चित्रपट, द डायरी ऑफ मणिपूरमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून साइन केले. आता मोनालिसाला शिकवण्याची जबाबदारीही सनोज मिश्रा सांभाळत आहे.
मोनालिसा शिकतेय लिहायला आणि वाचायला
रिपोर्ट्सनुसार, मोनालिसा या चित्रपटात निवृत्त आर्मी ऑफिसर अनुपम खेर यांच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. सध्या, मोनालिसा तिच्या पहिल्या भूमिकेसाठी तयारी करत आहे, चित्रपटाच्या टीमने तिला मुंबईत आणले आहे, जिथे ती प्रशिक्षण आणि शिक्षण घेत आहे आणि तिच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करत आहे. मुंबईतील चित्रपट निर्माते सनोज मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ती अभिनेत्री म्हणून पहिले पाऊल टाकत आहे. आता मोनालिसा शिकतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिग्दर्शक सनोज मिश्रांनी घेतली मोनालिसाच्या शिक्षणाची जबाबदारी
व्हिडिओमध्ये ती सनोज मिश्रा आणि तिच्या चुलत बहिणीसोबत एका खोलीत बसलेली दिसत आहे. सनोज मिश्रा मोनालिसाला शिकवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, सनोज मिश्रा मोनालिसाला एक प्रश्न विचारतात की, तीला वाचता किंवा लिहिता येत नसतानाही इन्स्टाग्राम कसं चालवते. यावर मोनालिसा सांगते की, ती फक्त फोटो अपलोड करते. व्हिडिओमध्ये, मोनालिसा उत्साहाने बाराखडी म्हणताना दिसत आहे, "अ आ, ई ई, उ उ,...".
हा व्हिडिओ शेअर करताना सनोज मिश्राने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “पृथ्वीवर जन्म घेतल्यापासून माणूस सर्वकाही शिकतो.आजच्या समाजासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे, अशा परिस्थितीत समाजात जे शिक्षणापासून वंचित आहेत, तीही अशीच आहे, जी आता वाचायला शिकत आहे, जी लोकांसाठी एक उदाहरण बनू शकते.'
सनोज मिश्रा यांनी मोनालिसाच्या कुटुंबियांची घेतली भेट
चित्रपट निर्माते सनोज मिश्रा यांनी मोनालिसाच्या कुटुंबासमवेत त्यांच्या भेटीचा एक व्हिडिओ शेअर केला होता, जिथे त्यांनी तिच्या आगामी चित्रपटात तिला काम देण्याचं आश्वासन दिले होते. आपला उत्साह व्यक्त करताना मिश्रा म्हणाले, "मोनालिसा कठोर परिश्रम करण्यास उत्सुक आहे आणि तिला यशाकडे नेण्याची जबाबदारी आपली आहे. 'राम जन्मभूमी' आणि 'काशी ते काश्मीर' सारख्या चित्रपटांचा समावेश असलेल्या दिग्दर्शनाच्या पोर्टफोलिओसह मिश्रा मोनालिसाची कथा मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी सज्ज आहे.