Akshaye Khanna On Marriage: अभिनय क्षेत्रामध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी कमी चित्रपटांमध्ये काम केलं मात्र, त्यांनी आपली छाप कायमची उमटवली. अशा कलाकारांच्या व्यक्तीगत आयुष्याकडेही चाहत्यांचं लक्ष असतं. असाच आपल्या अभिनयाची छाप सोडलेला आणि कायमच चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना. ‘हलचल’, ‘रेस’, ‘ताल’, ‘इत्तेफाक’, ‘दृश्यम 2’ यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिकेचं मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं. ‘दृश्यम 2’ नंतर आता अक्षय खन्ना आगामी ‘छावा’ या चित्रपटातून अत्यंत वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. लाइमलाइटपासून दूर असलेल्या अक्षयला त्याचं खासगीपण जपायला खूप आवडतं. तो लवकरच वयाची पन्नाशी गाठणार आहे, मात्र अद्याप त्यानं लग्न केलेलं नाही. यामागचं कारण त्यानं स्वत: एका मुलाखतीत सांगितलं आहे.


लग्नाबद्दल अक्षय खन्नाचं मत काय?


अक्षय खन्नाने 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, त्याला लग्न न करण्याचा निर्णय घ्यावा लागला, कारण त्याला त्याचे आयुष्य पूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणात हवं आहे. त्यानुसार, त्याचं मत आहे की लग्नामुळे आयुष्यात बरेच बदल होतात आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते. मी मॅरेज मटेरियल नाही, असं अक्षयने सांगितलं आहे. 


पुढे तो सांगतो, मी स्वत:ला विवाहित या दृष्टीकोनातून पाहू शकत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर, मी मॅरेज मटेरियल नाही. मी त्यासाठी बनलेलोच नाही. लग्न ही एक कमिटमेंट असते, ज्यामुळे तुमच्या रोजच्या आयुष्यात बरेच बदल होतात. लग्नामुळे बरंच काही बदलतं. मला माझं आयुष्य माझ्याच नियंत्रणात ठेवायला आवडतं. जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करता, तेव्हा स्वत:च्या आयुष्यावर तुमचं संपूर्ण नियंत्रण राहत नाही. तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते.


अभिनय क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी लग्न न करता मुलं दत्तक घेतली आहेत, किंवा सरोगसी पध्दतीने ते पालक झाले आहेत, भविष्यात असा काही विचार आहे का, असाही प्रश्न या मुलाखतीत अक्षय खन्नाला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, मी त्यासाठी तयार नाही. मला माझं आयुष्य कोणासोबत शेअर करायचं नाही. मग ते लग्न असो किंवा मुलबाळ असो. त्यांच्यामुळेही तुमच्या आयुष्यात बरेच बदल होतात. आयुष्यात आलेल्या नव्या व्यक्तीमुळे जे बदल होतात, ते मला नको आहेत. मला जे हवंय, ते त्यातून मिळणार नाही, असंही तो पुढे म्हणतो.


छावा चित्रपटातून अक्षय खन्ना प्रेक्षकांच्या भेटीला


छावा चित्रपटातून अक्षय खन्ना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयच्या आगामी ‘छावा’ चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षयचा औरंगजेबाच्या भूमिकेतला लूक प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी देखील अक्षयचं कौतुक केलं आहे, अक्षय मितभाषी असून त्याचा स्वभाव देखील खूप चांगला आहे, आणि तो प्रत्येक चित्रपटात मन लावून काम करतो. 'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा आता सर्वांसाठी सुरू झाली आहे. उद्या (14 फेब्रुवारीला) छावा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.