Madhuri Dixit Opens Up About Trolls: धक धक गर्ल माधुरी दीक्षित आजही तितकीच फिट, यंग आणि सुंदर दिसते. सध्या तिची 'मिसेस देशपांडे' ही वेबसिरीज प्रचंड चर्चेत आहे. सुरुवातीच्या काळात तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या खडतर काळात तिला आईकडून भावनिक स्थिरता, आत्मविश्वास आणि काम करण्याची ऊर्जा मिळाली होती. आईच्या सल्ल्याने तिला सुरुवातीच्या टीकेवर मात करण्यास मदत मिळाली, याबाबत अलिकडेच उघडपणे बोलताना दिसली. एका मुलाखतीत, अभिनेत्रीनं तिचा अनुभव शेअर केला आहे. यामुळे केवळ तिच्या कलात्मकतेलाच नव्हे तर तिच्या आत्मसन्मानालाही आकार मिळाला.
एका मुलाखतीत नयनदीप रक्षितशी बोलताना माधुरीने खुलासा केला की, "मला असं वाटतं की, माझ्या आईकडून मला तिची कला वारशाने मिळाली. माझ्या आईला गाण्याची आवड, नृत्याची आवड होती. माझी आई खूप भावनिक होती. मला वाटते की हे गुण मला तिच्याकडून वारशाने मिळाले आहेत", असं माधुरी म्हणाली. "मी खूप भावनिक व्यक्ती आहे. मी खूप लवकर लोकांशी नाते जोडते", असंही माधुरी म्हणाली.
शिस्त आणि प्रामाणिकपणा आईकडून मिळाला असल्याचेही माधुरी म्हणते, "माझा जो कष्टाळू स्वभाव आहे, तो खरंतर माझ्या आईकडून मिळाला आहे. माझ्या आईची विनोदबुद्धी माझ्याहीपेक्षा चांगली होती. ती लवकर कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देत असे. तिच्यात आत्मविश्वासाची खोल भावना होती, या गोष्टी मला तिने शिकवले आहेत. तुम्ही जसे आहात, तसे राहा. कोणत्याही साच्यात बसण्याचा प्रयत्न करू नका, साचा तोडून टाका, असं मला आई शिकवायची".
करीअरच्या सुरूवातीच्या टप्प्यात तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता, असा खुलासा माधुरीने मुलाखतीत केला. तेजाब चित्रपटापूर्वी तिला लूकबद्दल अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. "जेव्हा मी माझ्या करीअरची सुरूवात केली. तेव्हा लोक मला म्हणायचे की, हे कर, तुझे नाक कसे आहे, नाकाचा आकार बदल, हे आणि ते.. असे बरेच सल्ले मिळाले होते. त्यावेळी मी आईकडे सांत्वनासाठी जायची. मी आईजवळ जाऊन लोक काय म्हणायचे, हे सांगायची. तेव्हा माझी आई म्हणायची, काळजी करू नकोस. एकदा तुझा चित्रपट हिट झाला तर, लोकांना नापसंत गोष्टी देखील आवडतील", असं म्हणत माधुरीची आई तिला धीर द्यायची.
तेजाब चित्रपटानंतर माधुरीचे आयुष्य बदलले, असं तिने मुलाखतीत सांगितलं, "तेजाबनंतर मला कुणीही माझ्या लूकबद्दल ट्रोल केलं नाही. लोकांनी मला माझ्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे स्वीकारले होते", असं माधुरी म्हणाली. "जर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात, तर ते तुमचे वेगळेपण आहे. त्याचा तुम्ही आनंद घ्यायला हवे. त्याचा तुम्ही आनंद घ्या", असंही अभिनेत्री म्हणाली.