Sameer Vidwans On Election Commission :  सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections 2024) रणधुमाळी सुरू आहे. देशभरात सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक  पार पडणार आहे. राजकीय पक्षांच्या सभा पार पडत असून आरोप-प्रत्यारोप सुरू असून प्रचाराचा धुरळा उडाला आहे. राजकीय नेत्यांच्या प्रचाराच्या भाषणाला धार चढली आहे. तर, दुसरीकडे निवडणूक आयोगानेही निवडणूक कार्यक्रमासाठी कंबर कसली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी निवडणूक आयोगाचे प्रयत्न सुरू आहे. निवडणूक काळातील आचारसंहितेकडेही निवडणूक आयोगाकडून देखरेख केली जात आहे. अशातच आचारसंहितेबाबत निवडणूक आयोग गंभीर आहे का?  अशी चर्चा सुरू असताना मराठी दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत आली आहे. 


निवडणूक आयोगाने वृ्त्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीद्वारे आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास त्याची तक्रार नागरिकांना अॅपद्वारे करता येऊ शकते असे आयोगाने सांगितले आहे. आयोगाने आपल्या जाहिरातीमध्ये ''आचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, तर मी त्यांना रोखू शकतो.'' असे म्हणत नागरिकांना cVIGIL App डाउनलोड करून त्याद्वारे तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. 


निवडणूक आयोगाची हीच जाहिरात ट्वीटरवर पोस्ट करतदिग्दर्शक समीर विद्वांसने निवडणूक आयोगालाच सवाल केला आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करताना आढळल्यास आम्ही रोखू हो! पण तुमचं काय?!असा खडा सवालच केला आहे.






मागील काही दिवसांपासून राजकीय पक्षांकडून, जबाबदार नेत्यांकडून आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्याचे प्रकार समोर येत आहेत. काही नेत्यांच्या भाषणातून धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सुरू आहे. देव-धर्माच्या नावावर मतं मागितले जात असल्याचे समोर आले आहे. या सगळ्या गोष्टींवर नागरिकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी अनेकदा व्यक्त केली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होत असताना दुसरीकडे निवडणूक आयोग कोणतीही कारवाई करत नसल्याने सोशल मीडियावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर समीर विद्वांसची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. 


दिग्दर्शक समीर विद्वांस हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो.  मागील वर्षी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाचे चांगलेच कौतुक झाले. त्याशिवाय मराठीत त्याने डबल सीट, आनंदी गोपाळ, धुराळा या सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तर, समांतर या वेब सीरिजचेही दिग्दर्शन केले होते.






 इतर संबंधित बातमी: