मुंबई : सलमान खानच्या बहुसंख्य चित्रपटांना संगीत दिलेली जोडी म्हणजे साजिद-वाजिद. यापेकी वाजिद यांचा लॉकडाऊनमध्ये निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्री शोकसागरात बुडाली होती. वाजिद नेहमीच वेगवेगळ्या रिएलिटी शोमध्ये दिसत होते. त्यांच्या कामाची दखल नेहमीच घेतली गेली. वाजिद यांच्या निधनानंतर मात्र हे खान कुटुंबिय फार चर्चेत नव्हतं. पण आता वाजिद यांच्या पत्नीने खान कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. वाजिद यांची पत्नी कमलरुख खान यांंनी केलेल्या अनेक आरोपांपैकी सर्वात महत्वाचा आरोप असा की आपण इस्लाम धर्म स्विकारावा म्हणून खान कुटुंबियांनी आपला छळ केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


कमलरुख खान या मूळच्या पारसी. सुसंस्कृत, सुशिक्षित कुटुंबातून कमलरुख आल्या आहेत. या कुटुंबात स्त्रियांना सन्मान तर दिला गेलाच. पण त्यांच्या मतांचा आदरही राखला गेला. पण वाजिद यांच्याशी लग्न केल्यानंतर मात्र ही सगळी मूल्य पायी तुडवली गेल्याचं त्या सांगतात. कमलरुख आपल्या नेटमध्ये म्हणतात, 'मी पारसी कुटुंबातून आलेली. स्वातंत्र्य आणि शिक्षण यांचं महत्व माहीत असलेली मी जेव्हा खान कुटुंबात आले तेव्हा मात्र परिस्थिती कमालीची बदलली. स्त्रीला तिचं वेगळं मत असणं हेच नाकारलं गेलं. माझ्यावर वारंवार मी इस्लाम धर्म स्विकारण्याबद्दल दबाव आणला गेला. खरंतर मी नेहमीच त्याच्या सर्व रिवाजांचा आदर करत आले. त्याच्या श्रद्धा, त्यांचं सेलिब्रेशन सर्वच पातळ्यांवर मी त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होत आले पण तरीही मी इस्लाम स्विकारावा हा आग्रह धरला गेला. वारंवार छळही झाला. हे प्रकरण इतकं टोकाला पोचलं की मी आणि माझ्या पतीमध्ये घटस्फोट घडवून आणण्याच्याही गोष्टी झाल्या. पण मी हा धर्म स्विकारण्याला तयार नव्हते. आणि म्हणूनच मी त्याला शेवटपर्यंत नकार दिला.'


आपली ही स्थिती सांगतानाच कमलरुख सांगतात, 'माझे पती वाजिद हे अत्यंत हुशार संगीतकार होते. त्यांनी त्यांचं सगळं आयुष्य संगीताला वाहून घेतलं होतं. मला आजही असं वाटतं की काम करतानाच, त्यांनी माझ्यात आणि माझ्या मुलांमध्ये आणखी थोडा वेळ घालवायला हवा होता. माझ्या सासरच्या मंडळींनी धर्मांतरावरून चालवलेल्या हट्टामुळे आम्हाला चांगला वेळ घालवता आला नाही.'


वाजिद यांच्या पत्नीच्या या स्टेटमेंटमुळे धर्मांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याबद्दल खान कुटुंबियांनी अद्याप आपलं असं वेगळे स्टेटमेंट दिलेलं नाही. पण कमलरुख खान यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वाजिद खान यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. वाजिद खान यांचं कोरोनानं लॉकडाऊनमध्ये निधन झालं. साजिद वाजिद ही जोडी बॉलिवूडमधली नामांकित जोडी मानली जाते.