Lal Salaam Movie Trailer Rajinikanth :  सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्याचा आगामी 'लाल सलाम' चित्रपटाचा ट्रेलर (Lal Salaam Movie) रिलीज झाला आहे. या चित्रपटात विक्रांत आणि विष्णू मुख्य भूमिकेत आहेत. रजनीकांत ही आपल्या मुलीच्या चित्रपटात दिसणार आहेत. हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. खेळाच्या माध्यमातून धार्मिक सलोखा वाढवण्यावर हा चित्रपट भाष्य करतो. या चित्रपटाच्या माध्यमातून ऐश्वर्याने चित्रपट दिग्दर्शिका म्हणून पुनरागमन केले आहे. मागील काही महिन्यांपासून या चित्रपटाची उत्सुकता ताणली गेली होती.


5 फेब्रुवारी रोजी ऐश्वर्या रजनीकांत आणि लाल सलामच्या टीमने चित्रपटाचा ट्रेलर युट्युबवर लाँच केला. लाल सलाम हा चित्रपट समाजासाठी एक चांगला संदेश देण्यासह  हार्ड-हिटिंग स्पोर्टस् ड्रामा आहे. 


‘लाल सलाम’ च्या ट्रेलरची सुरुवात लोक घनदाट जंगलात कोणालातरी शोधत आहेत. त्यानंतर एका कारजवळ बॉम्बचा स्फोट होतो. पुढच्या सीनमध्ये विष्णूसह अनेक लोक क्रिकेट खेळताना दिसत आहेत. यानंतर हत्याकांड, जाळपोळ, दंगली पाहायला मिळतात. धर्मद्वेषाच्या राजकारणाचा कोनही चित्रपटात पाहायला मिळतो.


कपिल देवचाही कॅमिओ 


चित्रपटात सुपरस्टार रजनीकांतसह विष्णू विशाल, विक्रांत, विग्नेश, लिविंगस्टन, सेंथिल, जीविता, केएस रविकुमार आणि  थंबी रमैय्या यांचीही भूमिका आहे. दिग्गज भारतीय क्रिकेटपटू कपिल देव हेदेखील या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात कपिल देव हे क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये रजनीकांत आणि कपिल देव हे एकाच दृष्यात दिसले आहेत. 


'लाल सलाम' कधी होणार रिलीज?


चित्रपटाचा ट्रेलर खूपच दमदार आहे. लाल सलाम 9 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्याचा ट्रेलर रिलीज होण्याच्या अवघ्या 4 दिवस आधी ट्रेलर लॉन्च करण्यात आला. चित्रपटाचे पार्श्वसंगीत अप्रतिम आहे. ए. आर. रहमानने त्याचे संगीत दिले आहे.


या चित्रपटातही दिसणार रजनीकांत


मागील वर्षी रजनीकांत यांचा 'जेलर'हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. लाल सलामशिवाय, रजनीकांत यांच्याकडे 'वेट्टीयान' (Vettaiyan) चित्रपटदेखील आहे. 


पाहा लाल सलाम चित्रपटाचा ट्रेलर : 



रजनीकांत संघी असल्याचा आरोप, ऐश्वर्याने व्यक्त केला होता संताप


काही दिवसांपूर्वी रजनीकांत हे संघी अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपच्या जवळ गेले असल्याची चर्चा होती. त्यावरून  सोशल मीडियावर रजनीकांत यांच्यावर टीका सुरू  होती. त्यावर रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने संताप व्यक्त केला होता. माझे वडिल 'संघी' नाहीत. ते 'संघी' असते तर 'लाल सलाम' हा सिनेमा केला नसता", असे  ऐश्वर्याने म्हटले.