Pune: मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवनवीन प्रयोग होतात. याला प्रेक्षकांचा प्रतिसादही उत्तम मिळताना दिसतो. (Marathi Movie) मराठी प्रेक्षकांनी आतापर्यंत लग्न या विषयाभोवतीचे अनेक सिनेमे पाहिले. कधी मैत्री प्रेम आणि शेवटी लग्न असा प्रवास तर कधी लग्नानंतर जुळलेलं प्रेम असे विषय झाले . . आता लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी प्रयोग रंगणार आहे. स्त्रियांनी साकारलेला आणि स्त्री शक्तीला केंद्रस्थानी ठेवणारा ' लग्न आणि बरच काही' हा चित्रपट 2026 च्या महिला दिनाच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लग्नानंतर बाईचं जीवन हे फक्त जबाबदाऱ्यांमध्येच नाही तर त्यांच्या आयुष्यातला, नातेसंबंधांमधला आणि नव्या ओळखींचा प्रवास या सिनेमातून उलगडणार आहे. (Lagna Ani Barach Kahi)
मराठी चित्रपटातील 'महिलाराज'
या चित्रपटाचे दिग्दर्शन वेदांती दाणी करणार आहेत, तर निर्मिती डॉ. संजना सुरेश पै आणि अंजली नान्नजकर यांच्या देखरेखीखाली होणार आहे. कथा लेखिका यशश्री मसुरकर यांनी लिहिली असून, छायाचित्रण स्मिता निर्मल, संगीत वैशाली सामंत, एडिटिंग भक्ती मायाळू, प्रोडक्शन डिझाईन मुग्धा कुलकर्णी, ब्युटी आणि स्टायलिंग सुप्रिया शिंदे, पीआर प्रज्ञा सुमती शेट्टी आणि डिजिटल मार्केटिंग अश्मीकी टिळेकर यांनी सांभाळलं आहे. अभिनयातून हा चित्रपट जिवंत करणार आहेत लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेत्री पूजा सावंत आणि शर्मिला राजाराम शिंदे.
निर्माते आणि कलाकारांच्या मते, हा चित्रपट फक्त मनोरंजनाचा सिनेमा नाही, तर स्त्रीशक्तीचा गौरव, प्रेरणादायी कथा आणि मराठी चित्रपटसृष्टीत महिलांच्या सर्जनशीलतेला सादरीकरण देणारा अनुभव आहे. लग्नानंतर जीवन फक्त नव्या जबाबदाऱ्यांचं नाही, तर ते स्त्रीसाठी नवा अध्याय, नव्या अनुभवांचा आरंभ आणि नातेसंबंधांच्या नव्या ओळखींचा पाया ठरतो. हा चित्रपट प्रत्येक महिला प्रेक्षकाला तिच्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या संघर्षांशी ओळख करून देईल, आणि त्यातून प्रेरणा मिळेल.“लग्न आणि बरंच काही” हा चित्रपट प्रत्येक पायरीवर महिलांचा ठसा उमटवतो. कथा, दिग्दर्शन, अभिनय, संगीत आणि छायाचित्रण या सर्व बाबतीत स्त्रीशक्तीचा उत्सव स्पष्ट दिसून येतो. मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा चित्रपट एक नवीन प्रयोग ठरेल, जेथे महिलांच्या सर्जनशीलतेला आणि सामर्थ्याला पूर्णप्रमाणे सादरीकरण मिळेल.
मराठी सिनेसृष्टीला दिलेली नवी उभारी
चित्रपटाची घोषणा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली, तर प्रदर्शित होण्याची तारीख महिला दिनाच्या महिन्यात निश्चित केली गेली आहे. यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच स्त्रीशक्तीचा उत्सव अनुभवायला मिळणार आहे. “लग्न आणि बरंच काही” फक्त एक चित्रपट नाही, तर स्त्रीशक्तीचा गौरव आणि मराठी सिनेसृष्टीला दिलेली नवी उभारी आहे. हा चित्रपट प्रत्येक महिला प्रेक्षकाला तिच्या जीवनातील संघर्ष आणि प्रेरणा यांची आठवण करून देईल, तर पुरुष प्रेक्षकही या अनुभवातून स्त्रीशक्तीच्या मूल्यांची ओळख करून घेतील.