Kushal Badrike On Rahul Deshpande: संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra News) आपल्या तालावर खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे, 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya). महाराष्ट्रातील प्रत्येकानं या कार्यक्रमावर आणि कार्यक्रमात झळकलेल्या प्रत्येकावर भरभरुन प्रेम केलं. तब्बल 10 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2024 मध्ये या कार्यक्रमानं प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण, आजही हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमातले किस्से चाहत्यांना आपलेसे वाटतात. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमानं जेवढं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, तेवढाच हा कार्यक्रम कलाकारांसाठीही खास ठरला. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकारांना ओळख मिळाली. तर अनेक नामवंत सेलिब्रिटींनी पाहुणे म्हणून या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. अशातच 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातील कलाकारांच्या फळीतला सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या अभिनेता कुशल बद्रिकेनं 'सर्व काही'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अनेक गोष्टींवर भाष्य केलंय. 

Continues below advertisement

अभिनेता कुशल बद्रिकेने (Actor Kushal Badrike) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाबाबत एक महत्त्वाची आठवण सांगितली. कार्यक्रमादरम्यान भाऊ कदम यांनी संगीताशी संबंधित विचारलेला एक प्रश्न राहुल देशपांडे यांना खटकलेला, त्यांना काहीसा राग आल्याचं लक्षात येताच, कुशल बद्रिकेनं कशी परिस्थिती हाताळलेली, याचा किस्सा सांगितला.

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाचा किस्सा सांगताना कुशल नेमकं काय म्हणाला? (Kushal Badrike On Rahul Deshpande)

Continues below advertisement

मराठी अभिनेता कुशल बद्रिके म्हणाला की, "आम्ही प्रेक्षकांमध्ये जाऊन विशिष्ट व्यक्तीच्या बाजूला जाऊन बसायचं आणि पाहुण्यांना प्रश्न विचारायचे, अशी नवीन विनोदाची पद्धत सुरू केली होती. त्यानंतर आमच्याकडे राहुल देशपांडे आले होते. भाऊ कदमने प्रेक्षकांमध्ये बसून प्रश्न विचारण्यासाठी हात वर केला. तर राहुलसर म्हणाले की, 'हो. विचारा प्रश्न.' त्यावर भाऊ म्हणाला, 'तुम्ही जे गाणं गाता, तर ते कुठल्या ना कुठल्या रागात गाता...' तर त्यांनी 'हो', असं उत्तर दिलं. भाऊ कदम पुढे म्हणाला, 'एवढा कसला राग येतो तुम्हाला? रागात कशाला गायचं ना गाणं?"

'भाऊ कदमच्या या प्रश्नावर राहुल देशपांडे यांना कदाचित हा त्यांच्या कलेचा अपमान वगैरे होतोय का काय? असं वाटलं असावं. आम्ही आपली गंमत म्हणून करायला गेलो होतो. पण त्यांना असं वाटलं की, हा जरा चुकीचा प्रश्न आहे. त्यांचा एकदम चेहरा बदलला आणि ते एकदम गंभीर झाले. त्यानंतर आमच्या सेटवर एकच शांतता पसरली. कारण, आलेल्या पाहुण्यांना विनोदातून त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटतंय आणि आलेले पाहुणेसुद्धा कोण? तर इतके मोठे शास्त्रीय गायक राहुल देशपांडे. त्यानंतर मी हात वर केला आणि प्रश्न विचारला. मी म्हणालो, 'सर, आता माझी सटकली, मला राग येतोय, हे गाणं कोणत्या रागात गायलं आहे?' त्यावर राहुल सर उठले आणि आम्हाला हसून म्हणाले, 'अरे! तुम्ही धन्य आहात रे पोरं, धन्य आहात आणि ते हसायला लागले. त्यानंतर पुन्हा एकदा वातावरण निवळलं आणि शांत झालं.' असं कुशल बद्रिकेनं पुढे सांगितलं.

"त्यावेळी असा विनोद कसा सुचला? ते कसं झालं आणि काय झालं हे माहीत नाही. मला वाटतं की, ती एक दैवी वेळ असते आणि त्या वेळेला देव आपल्याला अशा गोष्टी देत असतो...", असं कुशल बद्रिके म्हणाला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad khandekar: 'खांड्या... हे खूपच झालं', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकर कुणावर संतापला? कमेंटवर रिप्लाय देत म्हणाला...