Kunal Kamra Troll Ranveer Alahabadia:रणवीर अल्लाहबादिया गेल्या वर्षी ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमधील वादग्रस्त प्रश्नामुळे चर्चेत आला होता. त्याच्यासोबत अनेक कॉमेडियन्सनाही फटका बसला होता आणि समय रैनाचा शोही या वादात अडकला होता. आता तब्बल वर्षभरानंतर रणवीरने एक पोस्ट शेअर केली असून त्यात त्याने आपल्या 10 वर्षांच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. एका घटनेने त्याला पूर्णपणे हादरवून टाकलं, असं त्याने म्हटलं आहे. या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये कुणाल कामराने प्रतिक्रिया देत त्याच्यावर निशाणा साधला आणि तो चांगला बनण्याचा दिखावा करत असल्याचा आरोप केला.
25मार्च रोजी सायंकाळी 5:11 वाजता रणवीर अल्लाहबादियाने आपल्या X हँडलवर एक पोस्ट केली. त्यात तो म्हणाला, “मला आणि माझ्या टीमला BeerBiceps आणि The Ranveer Show या प्लॅटफॉर्मला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी 10 वर्षे लागली. पण एका घटनेने हा संपूर्ण प्रवास हादरवून टाकला. जेव्हा टीमने पुढचं काय असा प्रश्न विचारला, तेव्हा मला संत कबीरांचा दोहा आठवला ‘धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय, माली सींचे सौ घड़ा, ऋतु आए फल होय.’ म्हणजेच प्रगतीसाठी जसा वेळ लागतो, तसाच पुन्हा उभं राहण्यासाठीही वेळ लागतो.”
कुणाल कामराने केलं रणवीरला ट्रोल
या पोस्टवर प्रतिक्रिया देताना कुणाल कामराने संताप व्यक्त केला. तो म्हणाला, “माझ्यासह ‘लेटेंट’मध्ये सहभागी असलेल्या 30 हून अधिक कलाकारांना अधिकाऱ्यांनी समन्स पाठवले. तुझ्या मूर्खपणामुळे संपूर्ण कॉमेडी इंडस्ट्रीला फटका बसला. अनेक शो रद्द झाले, वेन्यूजनी हात मागे घेतले. आजही अनेक चांगल्या कॉमेडियन्सचं आयुष्य कठीण झालं आहे. पण तू कधीच हा पैलू समजून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस.” त्याने पुढे रणवीरवर टीका करत म्हटलं, “चांगला माणूस असल्याचा दिखावा बंद कर. तू तसा नाहीसच. लाज वाटली पाहिजे तुला. क्रिएटिव्हिटीसाठी तू विषासारखा आहेस. आता लीपापोती थांबव आणि जे चांगलं जमतं तेच कर. लोकांना फसवणं, खोट्या गोष्टी सांगणं आणि फालतू प्रसिद्धी मिळवणं थांबव.”
‘इंडियाज गॉट लेटेंट’ वाद काय होता?
‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा वाद 2025मध्ये समोर आला होता. समय रैनाच्या शोमध्ये रणवीर अल्लाहबादियाने आई-वडिलांच्या नात्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. महाराष्ट्र सायबर सेलसह अनेक अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल केली आणि समन्सही बजावले. अनेक कॉमेडियन्स आणि कलाकारांची चौकशी झाली, तसेच हा शो यूट्यूबवरून हटवण्यात आलेला.
