मुंबई : भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिन प्रत्येकाने आपल्या घरात राहून मोठ्या उत्साहाने साजरा केला. ज्याला जमेल त्या पद्धतीने प्रत्येकाने देशाबद्दल आपला असलेला आदर व्यक्त केला. एरवी स्वातंत्र्यदिन आला की अनेक नवी गाणी येत असतात. देशभक्तीपर गाण्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. यंदा हे प्रमाण खूप कमी आहे. लॉकडाऊनमध्येही संगीतकार ऐश्वर्य मालगावे या कोल्हापूरच्या तरूण संगीतकाराने आपल्या गाण्यातून देशाबद्दलचा आदर तर व्यक्त केला आहेच, पण कोरोनाच्या संकटातूनही देश लवकर बाहेर पडेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
आजादी हे त्याचं गाणं स्वातंत्र्य दिनी लॉंच झालं. ऐश्वर्य मालगावे हे नाव मराठी सिनेसृष्टीला नवं नाही. त्याने यापूर्वी अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिलं आहे. तताड, फिरकी अशा सिनेमांचा यात समावेश करता येईल. या 15 ऑगस्टचं औचित्य साधून संगीतकार ऐश्वर्यने एक गाणं आज लॉंच केलं. त्याचं संगीत त्याने दिलं असून त्यानं आणि गायिका स्नेहा कुलकर्णी यांनी ते गायलं आहे. विशेष बाब अशी की कोल्हापूर परिसरातच त्याचं चित्रिकरण झालं आहे. या गाण्याचे नाव आजादी असं असून कॉर्डस दि म्युझिक स्टुडिओ या यु ट्यूब चॅनलवर ते मोफत पाहता येईल.
सध्या कोरोनाचं असलेलं सावट लक्षात घेऊन गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. हमसे ही हम को बचाना है.. खुद को ही बचाना है.. असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यात डॉक्टर, पोलीस यांनाही सॅल्यूट करण्यात आला आहे. नुकतंच हे गाणं युट्युबवर आलं आहे.