Kishore Kumar Death Anniversary: प्रसिद्ध गायक, अभिनेता आणि दिग्दर्शक किशोर कुमार यांची आज पुण्यतिथी आहे. किशोर कुमार यांनी  निर्माता, दिग्दर्शक गीतकार, स्क्रिप्ट रायटर आणि अभिनय अशा अनेक क्षेत्रामध्ये  काम केले. किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 मध्ये प्रदेशातील खंडवा येथे झाला. आजही किशोर कुमार यांचे चाहते त्यांचे चित्रपट आणि गाणी आवडीने पाहतात. किशोर कुमार यांच्याबद्दल अनेक आठवणी आहेत. एका मुलाखतीमध्ये त्यांच्या मुलाने म्हणजेच अमित कुमार यांनी किशोर कुमार यांच्या मृत्यू आधीची एक आठवण सांगितली होती. ती आठवण ऐकून अनेक जण आश्चर्यचकित झाले होते. 


 किशोर कुमार यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली आहे. लहानपणापासूनच किशोर कुमार यांना खूप पैसे कमवण्याची इच्छा होती. किशोर कुमार यांना त्यांच्या मोठ्या भावा पेक्षा म्हणजेच अशोक कुमार यांच्या पेक्षा जास्त पैसे कमवायचे होते. किशोर यांना अशोक कुमार, सती देवी, अनूप कुमार हे भाऊ बहिण होते. कुटुंबात सर्वांत  लहान असणाऱ्या किशोर कुमार यांचे आवडते गायक केएल सहगल होते. किशोर हे केएल सहगल यांच्या सारखं होण्याचे स्वप्न पाहात होते.


मुंबईमध्ये राहणाऱ्या किशोर कुमार यांना त्यांचे जन्म झालेले ठिकाण म्हणजेच खंडवा हे मुंबईपेक्षा जास्त प्रिय होते. एका मुलाखतीमध्ये किशोर कुमार यांनी मुंबई आणि  खंडवाबद्दल सांगितले होते की, 'कोणता मूर्ख व्यक्ती या शहरात राहू इच्छितो. इथे प्रत्येक  जण एकमेकांचा वापर करून घेतो. कोणही एकमेकांसोबत मैत्री करत नाही. कोणावर विश्वास ठेवता येत नाही. मी माझ्या जन्म जिथे झाला तिथे म्हणजेच खंडवा शहरात जाणार आहे.' बॉलिवूडमधील राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या प्रसिद्ध कलाकारांना किशोर कुमार यांचा आवाज प्रचंड आवडत होता. 
 
किशोर कुमार यांनी चार लग्न केली. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव  रूमा गुहा ठाकुरता असे होते. लग्नानंतर 8 वर्षांनंतर किशोर कुमार आणि रूमा यांचा घटस्फोट झाला. त्यांनतर 1960 साली मधुबाला यांच्यासोबत लग्न केले होते. वयाच्या 35 व्या वर्षी मधुबाला यांचे निधन झालं. त्यानंतर किशोर कुमार यांनी योगिता बाली यांच्या सोबत लग्न केले. लग्नानंतर दोन वर्षांनी किशोर कुमार आणि  योगिता यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 1980 मध्ये किशोर कुमार यांनी लीना यांच्यासोबत लग्न केले. 


किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की किशोर कुमार यांनी मृत्यू येण्याच्या काही वेळ आधीच मृत्यूचा आभास झाला होता. अमित कुमार यांनी सांगितले, 'त्या दिवशी त्यांनी  सुमितला (अमित यांचा सावत्र भाऊ) स्विमिंगला जाण्यापासून थांबवले. त्यांना या गोष्टीची खूप काळजी होती की, कॅनेडामधून त्यांची फ्लाइट लॅंड करेल की नाही. त्यांना  हार्ट अटॅक संबंधित काही लक्षण दिसत होती. एकेदिवशी त्यांनी मजेत सांगितले की, जर तुम्ही डॉक्टरांना बोलवले तर मला खरच हार्ट अटॅक येईल. त्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आला.' 13 ऑक्टोबर 1987 रोजी किशोर कुमार यांचे निधन झाले.