मुंबई :  अनेक भक्तीगीतांमुळं प्रसिद्ध असलेले आणि निवडक चित्रपट गीतं लिहिणारे पंडित किरण मिश्र यांचं आज मुंबईच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते 67 वर्षांचे होते. त्यांना तीन दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे पंडित किरण मिश्र यांना 15 दिवसांपूर्वीच कोरोनाची पहिली लस देखील घेतली होती. 


पंडित किरण मिश्र यांनी शेकडो भक्ती गीतं लिहिली होती, सोबतच अनेक चित्रपटांसाठी तसेच लोकप्रिय मालिकांसाठी देखील गीतलेखन केलं होतं.  


किरण मिश्र यांचे पुत्र स्वदेश मिश्र यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, "आधी आम्ही वडिलांची कोरोना टेस्ट केली त्यावेळी ती निगेटिव्ह आली. त्यानंतर आम्ही हृदयरोग तज्ञांकडे गेल्यावर सीटी स्कॅन केला. त्यानंतर कोरोना चाचणी त्यावेळी मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आम्ही लगेच त्यांना अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात भर्ती केलं.  


स्वदेस मिश्र यांनी सांगितलं की, "3 दिवसांपूर्वी वडिलांचा ऑक्सिजन स्तर एकदम खाली आला. त्यांना श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. त्यातच त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास सुरु झाला.  


स्वदेश यांनी सांगितलं की, 15 दिवसांपूर्वी किरण मिश्र यांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना थोडा ताप आला होता.  


गायक अनूप जलोटा यांनी पंडित किरण मिश्र यांनी लिहिलेली 50 हून अधिक भक्ती गीतं गायली आहेत. अनूप जलोटा यांनी किरण मिश्र यांच्या निधनानंतर बोलताना म्हटलं की, किरण मिश्र हे खूपच साधे आणि सरळ व्यक्ती होते. त्यांची सर्वांशी वागण्याची पद्धत आपुलकीची होती. हे त्यांचं जाण्याचं वय नव्हतं. मी त्यांना आणि त्यांच्या मैत्रीला मिस करेल, असं जलोटा यांनी म्हटलं आहे.