Kiran Mane : दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या भूकंपामुळे बरीच खळबळ माजली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेलं बंड हे महाराष्ट्राच्या राजकारणातला टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर बरेच दावे प्रतिदावे, वार प्रतिवार हे सगळं झालं. पण त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ज्या पद्धतीने राजीनामा देत मुख्यमंत्री पद सोडलं त्याचं कौतुकही झाल्याचं पाहायला मिळालं. त्याच पार्श्वभूमीवर किरण माने (Kiran Mane) यांनी एक पोस्ट केली होती. त्याच पोस्टची सध्या चर्चा सुरु झाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतरची पोस्ट किरण माने यांनी शेअर केलीये. शनिवार 27 जुलै रोजी उद्धव ठाकरेंचा वाढदिवस झाला. त्याचनिमित्ताने किरण मानेंनी ही पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याच्या दिवशी काय घडलं या घटनेचा पुनरुच्चार केला आहे.
किरण माने यांनी काय म्हटलं?
किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'ही दोन वर्षांपुर्वीच्या त्या दिवशीची पोस्ट आहे, ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी गद्दारांचे घाव झेलून हसतमुखानं राजीनामा देऊन वर्षा बंगला सोडला. ...उद्धवजी, एकच शब्द : 'ग्रेसफुल' !सत्यघटना सांगतो. सातार्याजवळ खिंडवाडी नांवाचं एक छोटं गांव आहे. तिथं एका मित्राकडं काल मी जेवायला गेलो होतो. एकतर गांव लै छोटं. त्यात गांवापास्नं लांब शेतात एकाकी असलेलं घर. लै दिवसांनी जमिनीवर मांडी ठोकून जेवायला बसलो, आणि 'ती' बातमी दिसली...'
'कुणाचा विश्वास बसणार नाही, पण तुम्ही राजीनामा दिलात हे कळल्यावर, त्या घरातला एकेक माणूस हळहळला. च् च् च् च् असे आवाज आले. काहीजणांच्या डोळ्यांत पाणी आलं. घरातल्या तरण्या लोकांपास्नं म्हातार्यांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य होतं 'चांगला मानूस व्हता'!उद्धवजी, खरं सांगू? तुमच्या आयुष्यात जे घडलं, ती राजकारणात 'कॉमन' गोष्ट आहे. खर्या आयुष्यात गरीब,श्रीमंत,सामान्य,सेलिब्रिटी..त्याच्या त्याच्या पातळीवर विश्वासघाताचं दु:ख सगळ्यांना पचवावं लागतं.'
'पण अशावेळी खूप कमी लोक तुमच्यासारखे 'धीरोदात्त' असतात ! जे घडलं ते 'माणूस' म्हणून उद्ध्वस्त करणारं होतं. तुम्ही आतनं 'तुटला' नसाल का हो? काळजाला घरं पडली नसतील का? जी माणसं तुमच्या पक्षानं शून्यातनं वर आणली, त्या माणसांबरोबरचे सुरूवातीपासूनचे कित्येक आनंदा-दु:खाचे क्षण तुमच्या डोळ्यांसमोर तरळले नसतील का?'
'कुणी म्हणेल, 'ही राजकारणी लोकं लै पोचलेली असतात. सगळे सारखेच.' हे ही मान्य. तरीही मी फक्त 'माणूस' म्हणून विचार करतोय. मी स्वत: यातनं गेलोय. जवळच्यांनी पाठीत खंजीर खुपसल्यावर वेदना होतातच. काळीज तुटतंच. तरीही किती संयमानं, उद्वेग-चिडचिड न करता तुम्ही शांतपणे पद सोडलंत !'
'पण आता आज एकाही नेत्याकडं नसेल अशी एक गोष्ट आता तुमच्याकडं आहे. आता तुमच्याजवळ जे उरलेत ते अत्यंत नि:स्वार्थी, निष्ठावान, शुद्ध - स्वच्छ मनाचे कार्यकर्ते आहेत. भले संख्या कमी असेल, पण जे आहेत ते मनाच्या तळापास्नं 'तुमचे' आहेत. जितक्या नि:स्वार्थीपणे तुमच्यासोबत रश्मीजी आणि आदित्य आहेत, तितक्याच नितळ भावनेनं आता उरलेले सगळे शिवसैनिकही तुमचे आहेत. गाळ बाजूला गेला, आता शंभर टक्के 'प्यूअर' असलेला एकेक माणूस तुमच्यासोबत आहे. नशीबवान आहात !'
'तुम्हाला राखेतनं झेप घ्यायचीय.. शून्यातनं विश्व उभं करायचंय.. हे लिहीणारा मी ना शिवसैनिक, ना राजकारणी. तुम्ही आयुष्यात कुठली मदतही मला केलेली नाही आणि मी ती अपेक्षाही कधी ठेवली नाही. तरीही मला तुमच्याबद्दल आज हे वाटतंय, ही तुमची 'ॲचिव्हमेन्ट' आहे , अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली होती. ती त्यांनी रिशेअर केली आहे.'
'या पोस्टचा शेवट करत त्यांनी म्हटलं की, उद्धवजी, आज मी शिवसैनिक आहे ! थेट मातोश्रीवर बोलावून तुम्ही मला शिवबंधन बांधलंत. आता कळतंय, बाहेरून तुम्ही जसे वाटत होतात, तसेच 'आतून'ही आहात. नितळ, निर्मळ आणि संवेदनशील ! एक दिवस उशीरा का होईना, पण तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.'