Kiran Mane : सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Election 2024) वारे वाहतायत. अवघ्या काही तासांत लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यातच सध्या सोशल मीडियावरही निवडणुकांचं वातावरण तयार झाल्याचं पाहायला मिळतंय. अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची देखील सोशल मीडियावरची अशीच एक पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आलीये. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोल बॉन्ड अवैध ठरवल्यानंतर त्याबाबतही बऱ्याच गोष्टी समोर येऊ लागल्या. त्यातच आता या इलेक्ट्रोल बॉन्डशी निगडीत पोस्ट करत किरण मानेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. 


किरण माने यांनी  सिरम इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा अदर पुनावाला आणि मेघा इंजिनियरींगचे मालक पी.पी. रेड्डी यांना उद्देशून एक संतत्प पोस्ट टाकली आहे. त्यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये अनेक गंभीर आरोपही केले आहेत. अनेकांनी या पोस्टवर कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय. 


किरण मानेंचे पी.पी.रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप


अभिनेते किरण माने यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टवरुन पी.पी.रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. यावर त्यांनी म्हटलं की, 'निवडणुकीसाठी तब्बल 966 करोड रूपयांची देणगी देणारा पी.पी. रेड्डी. 'मेघा इंजिनियरींग'चा मालक. गरीब शेतकर्‍याचं हे पोरगं. हाताखाली दोन कामगार घेऊन कंपनी काढतं आणि हळूहळू 67,500 करोडचं साम्राज्य उभं करतं ! पण 2019 मध्ये पी.पी. रेड्डीवर इनकमटॅक्सची रेड पडते. ऑफिस, घर आणि गेस्टहाऊससहित पंधरा ठिकाणी कंपनीच्या प्राॅपर्टीवर छापा टाकला जातो. रेड्डी आणि त्याची कंपनी आर्थिक व्यवहाराच्या आरोपांच्या जाळ्यात अडकते.त्यानंतर तो सत्ताधारी राजकीय पक्षाला करोडोंच्या देणग्या देणं सुरू करतो ! विशेष म्हणजे लगेच आर्थिक गैरव्यवहाराच्या बातम्या दाबल्या जातात आणि भाजपाकडून मेघा इंजीनियरिंगला हिमालयात 'जोजिला' बोगदा बनवायचं 4509 करोड़ रूपयांचं प्रोजेक्ट मिळतं.' 


पुढे किरण मानेंनी म्हटलं की, 'आशिया खंडातला सगळ्यात लांब बोगदा ! ज्याबद्दल नितिन गडकरी मेघा इंजिनियरींगचं भरभरुन कौतुक करतात. गेल्या वर्षी मेघा इंजिनियरिंगला संरक्षण मंत्रालयाकडनं 5000 करोड़चं प्रोजेक्ट मिळालं. एप्रिल 2023 मध्ये मुंबईत 'ठाणे-बोरिवली' ट्विन टनेल प्रोजेक्ट लार्सन ॲन्ड टुब्रोकडून हिसकावून घेऊन 'मेघा'ला दिला गेला.मेघा कंपनीनं चीन कडून बीवायडी टेक्नाॅलाॅजी घेऊन 'इलेक्ट्रिक बस' तयार करण्यासाठी 'ओलेट्रा ग्रीनटेक' ही सब्सिडियरी कंपनी काढली आहे. असो. लिस्ट संपणार नाही. समझनेवालोंको इशारा काफी है ! दुर्दैव हे की आज गरीब शेतकरी दहा हजाराच्या कर्जासाठी गळफास लावून घेत असताना हे शेतकर्‍याचं पोरगं मात्र मातीशी बेईमानी करत शेतकर्‍यांचं आंदोलन क्रूरपणे दाबणार्‍या सत्ताधार्‍यांना शेकडो करोडच्या देणग्या देतंय ! किती हा कृतघ्नपणा !!हो, हो माहिती आहे "कितीही आपटा, येणार तर....." पण आमच्यासाठी 'राष्ट्र'प्रथम... विषय कट.'


सिरम इन्स्टिट्यूटवरील पोस्टही चर्चेत


किरण माने यांनी यापूर्वी केलेल्या पोस्टमध्ये सिरम इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांच्याविषयी देखील भाष्य केलं आहे. त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलं की,  'सिरम इन्स्टिट्यूट'नं तयार केलेली कोविडवरची लस घेतली तुम्ही? त्यानंतर मिळणारं माननीय पंतप्रधानांचा फोटो असलेलं सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे? त्या 'सिरम इन्स्टिट्यूट'नं १८ ऑगस्ट २०२२ ला एका राजकीय पक्षाला निवडणुकीसाठी करोडो रूपये दिल्याचा पुरावा इलेक्टोरल बाॅन्डमधनं समोर आलाय !बाकी त्यानंतर २३ ऑगस्टला आदर पुनावालाला कुठला राजकीय नेता भेटला... एकमेकांचं कौतुक कसं झालं... हे मी नाही सांगत बसणार. तुम्ही कमेन्ट बाॅक्समध्ये लिहालंच. बाय द वे... एक सांगायचं राहीलंच. आपल्या सगळ्या देशानं लसी टोचुन घेतल्यानंतर, डिसेंबर २०२३ मध्ये या आदर पुनावालानं लंडन इथं भव्य, आलीशान बंगला विकत घेतला... ज्याची किंमत आहे, १४४६ करोड रूपये ! आणि हो, पुनावाला हा घोड्यांचा मोठा व्यापारीही आहे. नाही नाही, गुवाहाटी किंवा सुरतच्या घोड्यांचा नाही, खर्‍या घोड्यांचा. असो. हो हो माहिती आहे, "कितीही आपटा येणार तर..."  पण आमच्यासाठी 'राष्ट्र' प्रथम... विषय कट !


ही बातमी वाचा : 


Gashmir Mahajani : मराठी इंडस्ट्री ग्रो होऊ शकते का? चाहत्याच्या प्रश्नावर गष्मीरने स्पष्टचं म्हटलं, नक्कीच पण....