Kiran Mane on Rohit Pawar : ठाकरे गटाकडून किरण माने (Kiran Mane) यांची लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली आहे. पण त्याआधीपासून किरण माने यांची प्रत्येक फेसबुक पोस्ट ही चर्चेचा विषय असते. नुकतच किरण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर लिहिलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालीये. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांच्यावरही ईडी चौकशी लागली होती. त्याच पार्श्वभूमीवर किरण माने यांनी रोहित पवारांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे. 


बारमती अॅग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती. आमदार रोहित पवार यांच्याकडे बारमती अॅग्रो कंपनीची मालकी आहे. बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयांवर छापेमारी करत ईडीकडून तपास करण्यात आला होता. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती.बारामती अॅग्रो प्रकरणी आमदार रोहित पवार यांची या आधी दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर बारामती अॅग्रोच्या संबंधित संपत्ती जप्त करण्यात आली. ईडीने रोहित पवारांशी संबंधित बारामती अॅग्रो संबंधित औरंगाबादमधील कन्नड साखर कारखान्यातील 161.30 एकरची संपत्ती जप्त केली. 


किरण माने यांनी काय म्हटलं?


किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं की,  'ईडीची धाड पडल्याची बातमी आल्या-आल्या रोहितदादांना मी फोन केला होता. दुपारचे दोन वगैरे वाजले असतील. रिंग झाली पण उचलला नाही. सहसा असं होत नाही. म्हटलं, नक्की त्या ईडीच्या चौकशीत असतील... त्या दिवशी संध्याकाळी माझ्या सासुरवाडीला धामणेरला एक कौटुंबिक कार्यक्रम होता तिकडे गेलो. सगळ्या पाहुण्यांच्या गराड्यात असताना फोन वाजला. स्क्रीनवर नांव बघतोय तर रोहितदादा ! "बोला किरणजी. तुमचा मिसकाॅल दिसला." मी अत्यंत कळकळीनं दादांना म्हणालो, "हे बघा दादा. ईडी येऊद्या, सीबीआय येऊद्या नायतर ते रंगाबिल्ला घरात येऊद्या... तुम्ही लाचार झालेले आम्हाला चालणार नाही. तुरूंग तर तुरूंग. आम्ही रस्त्यावर उतरून लढू तुमच्यासाठी. पण तुम्ही कसल्याही परिस्थितीत त्या भिकारचोटांच्या वळचणीला जाऊ नका." रोहीतदादा हसले, "किरणजी, अजिबात चिंता करू नका. निर्धास्त रहा. मी हलत नाही." 


हा वाघ ताठ कण्यानं उभा आहे - किरण माने


पुढे किरण माने यांनी म्हटलं की, 'आजपर्यंत सगळी चौकशी, जप्ती वगैरेंचा मनस्ताप सहन करून हा वाघ ताठ कण्यानं उभा आहे. मिटींग्ज घेतोय. सभा गाजवतोय. तिकीटं वाटपाच्या निर्णयात अधिकारवाणीनं मतं मांडतोय. देणारा हात आहे, तो कुणापुढं पसरणारा झालेला नाही ! गड्याहो, आयुष्यात हा स्वाभिमान महत्त्वाचा. रोहितदादा, तुम्ही तो जपलात. आम्हाला तुमचा अभिमान आहे. आता लढायचं, झुंजायचं आणि जिंकायचं. बास.'



ही बातमी वाचा : 


BJP : भाजपचा 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील पात्रांच्या माध्यमातून प्रचार; 'हे अजिबात चुकीचं नाही', निर्माते आसितकुमार मोदींचं स्पष्ट मत