Khalid Ka Shivaji Movie : खलिद का शिवाजी या सिनेमाला राज्यातील हिंदुत्वत्वादी संघटनांकडून कडाडून विरोध केला जातोय. मुंबईतील (वरळी)एनएससीआय डोम येथे हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा सुरु असताना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सिनेमाला विरोध म्हणून घोषणाबाजी देखील केली होती. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लिम सैनिकांची टक्केवारी आणि शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली, अशा काही संवादाला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध आहे. विरोध वाढल्यानंतर आता सिनेमाच्या दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी वादग्रस्त संवाद काढून टाकण्याची प्रक्रिया सुरु करत असल्याचं म्हटलंय. याबाबतचं एक पत्रक निर्मात्यांकडून जारी करण्यात आलं आहे.
निर्मात्यांनी प्रसिद्ध केलेलं पत्रक जसंच्या तसं
नमस्कार समस्त रसिक मायबाप प्रेक्षकहो, तुमत्त्याशी जरा बोलायचंय, तुम्हाला काही सांगायचंय म्हणुन हा प्रपंच. आमचं म्हणणं तुमच्यातल्या काहींना पटेल आणि काहींना पटणारही नाही, आमच्या म्हणण्यावर तुमचे आक्षेपही राहातील पण छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही कधीच शंका घेऊ शकणार नाही.
येणाऱ्या 8 ऑगस्ट 2025 रोजी आमचा "खालिद का शिवाजी" हा चित्रपट येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि त्यावर मतमतांतरे सुरू झालीत. या अनुषंगाने आम्हाला आमचं म्हणणं तुम्हा रसिक मायबाप प्रेक्षकांच्या चरणी रुजू करायचंय. आमच्या कलाकृतीवर प्रामुख्याने 4 आक्षेप नोंदवले गेलेत त्याबाबत आमचं हे म्हणणं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान होते आणि त्यांचे 11 अंगरक्षक मुस्लीम समाजाचे होते. याबाबत हे प्रामाणिकपणे मान्य करावं लागेल की चित्रपटात देण्यात आलेली संख्या ही ऐतिहासीक कागदपत्रांच्या आधारे नाही. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात कतृत्व बघून संधी दिली जात असल्याने त्यांनी सैन्याची जाती-धर्माच्या आधारावर शिरगणती केली नाही. त्यामुळे त्यांचं एकूण सैन्य किती आणि त्या एकूण सैन्यात कुठल्या जाती धर्माचे किती लोक होते हे सांगणं निव्वळ अशक्य. आम्ही चित्रपटातील पात्राच्या तोंडी दिलेल्या संख्येपेक्षा तो आकडा जास्तही असू शकतो किंवा कमी देखील. मात्र छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लीम नव्हतेच हे म्हणणे देखील अनैतिहासिकच आहे. छत्रपती महाराजांच्या नौदलाचे प्रमुख किंवा दौलतखान, सिद्दी हिलाल, मदारी मेहतर असे अनेक मुस्लीम छत्रपती महाराजांच्या सैन्यात होते, अर्थात ती त्या काळातील म्हणजे मध्ययुगातील परिस्थितीच होती. जसे अनेक मुस्लीम सैनिक महाराजांच्या सैन्यात होते तसेच मुघलांच्या सैन्यात अनेक गैरमुस्लीमही होते त्यामुळे आकडे चुक असतीलही पण माहिती अनैतिहासीक नाही आणि त्याचे पुरावे उपलब्ध आहे.
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधली याबाबतही काही गोष्टी आपल्यासमोर मांडणं आवश्यक आहे. मुळात पहिल्यांदा हे बघावं लागेल की रायगडावर मश्जिद होती की नाही. याबाबत आपल्याला कालसापेक्ष विचार करावा लागेल. 1964 साली भारत सरकारने प्रकाषीत केलेल्या कुलाबा गॅझेटीयरमधे पान क्र. 128 वरील शेवटच्या परिच्छेदात रायगडावरील परिच्छेदात मश्जितीचा उल्लेख आला आहे. यात संबंधीत वास्तुचे मोजमापही स्पष्टपणे नोंदवण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने 1962 साली प्रकाशित केलेल्या शांताराम विष्णु आवळसकर लिखित रायगडाची जीवनकथा या संशोधनात्मक पुस्तकाच्या पान क्र. 22 वर किल्लेरायगडाचा नकाशा दिला आहे त्यात महादरवाज्याच्या आत गेल्यावर डाव्या हाताला दारूच्या कोठारा समोर "पीर" लिहून मश्जिदीची आकृती चितारण्यात आली आहे. अर्थात ती मश्जिद छत्रपती महाराजांनी बांधुन घेतली याबाबतचा उल्लेख नागपुर विद्यापिठाच्या इतिहासशास्त्र विभागाचे प्रमुख, इतिहास संशोधक प्रा.मा.मा. देशमुख लिखित मध्ययुगीन भारताचा इतिहास युगप्रवर्तक शिवराज आणि मराठ्यांची शौर्यगाथा भाग तिसरा या पुस्तकाच्या पान क्र. 71 वर "शिवाजीने रायगडावर मुसलमानांसाठी मशीद बांधली होती" असं स्पष्टपणे लिहीलेलं आहे. या पुस्तकावर आधी महाराष्ट्र सरकारने बंदी घातली होती मात्र त्या बंदी विरोधात मा. उच्चन्यायालयात स्पष्टीकरण आणि पुरावे सादर केल्यानंतर मा. उच्चन्यायालयाच्या आदेशाने ती बंदी उठवण्यात आली. याशिवाय रायगडावर गेल्यावर आपल्या हेही लक्षात आल्याशिवाय रहाणार नाही की रायरेश्वराच्या मंदिराचे स्थापत्य महाराजांनी स्वतः हिंदू-मुस्लीम स्थापत्यशैलीत करून घेतले. यावरून महाराजांना परधर्मियांच्या प्रार्थनास्थळांचा द्वेश होता असं म्हणता येणार नाही. उलट काफी खानाने लिहीलेल्या समकालीन इतिहासात अशी नोंद सापडते की शिवाजी महाराजांना युध्दादरम्यान मुस्लीम धर्मग्रंथ सापडलेत तर महाराज ते ग्रंथ सैन्यातील मुस्लीम सैनिकांस देऊन टाकीत असे. एक महात्वाची गोष्ट आपण रसिक मायबापांना लक्षात घ्यायला हवी की आम्ही कलाकार मंडळी आहोत, इतिहास संशोधक नाही त्यामुळे इतिहास संशोधकांनी केलेलं इतिहास संशोधनावर आम्ही विश्वास ठेवून संवाद लिहीतो.
एक व्यक्ती नाही तर विचार आहे जो जगभरातल्या लोकांना आदर्श आहे आणि ते भौगोलिक स्थानापुरते, सामाजिक घटकापुरते मर्यादित नाही असं आम्ही मांडण्याचा प्रयत्न केल्याने यात इतिहासाचं विकृतीकरण नाही तर महाराजांची वैश्विक स्विकार्हता दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
शिवाजी खालीदचा कसा असेल "शिवाजी महाराज कोणाचे? ज्याला कळाले त्याचे" असा चित्रपटात दाखवलेला संवाद यासाठी बोलका आहे. महाराज केवळ एका राज्याचे, एका देशाचे किंवा एका खंडाचे नाही तर जगाचे आदर्श आहेत. जगभरातील प्रत्येकाला महाराज समजुन घेण्याचा आणि त्यांना आदर्श मानण्याचा अधिकार आहे. याचमुळे महाराज हिंदू-मुसलमान-इसाई-बौध्द-गोरे-काळे-उंच-बुटके-स्त्री-पुरुष अशा सगळ्यांचे आहे. चित्रपटाची मांडणी करतांना एक मुस्लीम मुलगा महाराजांविषयी नेमका कशा पध्दतीने विचार करतो या कथाबिजा भोवती हा चित्रपट असल्याने ज्याला ज्याला इतर कशाहीपेक्षा माणुसकी सर्वश्रेष्ठ वाटते अशा प्रत्येकाचे ते असतील हा विचार या चित्रपटात देण्यात आला आहे.
आपण रसिक प्रेक्षक आमचे मायबाप आहात, चित्रपटातून आम्ही मनोरंजनाबरोबरच एक विचार मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमच्यामागे कुणी मोठा स्टुडीओ नाही, कुणी मोठी संस्था नाही, तरीही भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि कुळवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर विश्वास ठेऊन आम्ही आमचा चित्रपट आपल्या सेवेत दाखल करीत आहोत. चित्रपटावर मत व्यक्त करणं हा आपला अधिकार आम्ही शिरोधार्य मानतो आणि विनंती करतो की 120 मिनीटाच्या चित्रपटाविषयी 3 मिनीटाचा ट्रेलर बघुन टीका करू नका. आम्हाला खात्री आहे की हा चित्रपट बघितल्यावर आपल्याला नक्की आवडेल, चित्रपट बघितल्यावरही तो आवडला नाही तर मात्र नक्की टिका करा. आम्हाला विश्वास आहे की आमच्या तंत्रावर, कथामांडणीवर तुमचे आक्षेप असतीलही पण आमच्या उद्देशांवर तुम्ही कधीच शंका घेऊ शकणार नाहीत. याउपरही आपल्या सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षकांच्या भावनांचा विचार करता चित्रपटामुळे केवळ मनोरंजन व्हावं कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या उद्देशाने आम्ही या चित्रपटातील वादात आलेले संवाद त्वरीत काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वंदे मातरम्, जय शिवराज.
इतर महत्त्वाच्या बातम्या
VIDEO : अनाया बांगरने पहिल्यांदाच नेसली साडी, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाली, पू बनली पार्वती
45 कोटीचं बजेट, धडक 2 चा फ्लॉप शो, 5 व्या दिवसानंतर पदरी निराशाच, किती कमावले?