मुंबई : खालिद का शिवाजी या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक महिन्यासाठी स्थगिती देण्यात आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राज मोरे यांनी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याकडून याबाबत माहिती मिळाल्याचं सांगितलं आहे. खालिद का शिवाजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामधील काही संवादांवर हिंदुत्त्ववादी संघटनांकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते. चित्रपटाच्या प्रदर्शनाला बंदी घालावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारला चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याबाबत पत्र लिहिलं होतं. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य खात्याकडून फ्रान्स मधील कान्स फिल्म फेस्टिवलसाठी हा चित्रपट पाठवण्यात आला होता.
चित्रपटाचं पुन्हा परीक्षण होणार
खालिद का शिवाजी या चित्रपटाचं प्रदर्शन 8 ऑगस्ट रोजी होणार होतं. मात्र, हिंदुत्त्ववादी संघटनांकडून विरोध झाल्यानंतर या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारला पत्र लिहिलं त्यानुसार आज दुपारनंतर साडे चार वाजता दिग्दर्शकांना त्यांची बाजू मांडण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याकडून पुन्हा एकदा चित्रपटाचे परीक्षण करण्यात येणार आहे. एक महिन्याच्या काळात परीक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतरच चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होईल. मागील 3 दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटनांकडून चित्रपटाला विरोध करण्यात आल्यानंतर सरकारच्या सांस्कृतिक खात्याकडून दखल घेण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाच्या 60 आणि 61 व्या राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करत असताना दोन जणांकडून चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्याची करण्यात आली होती.
आशिष शेलार यांचं ट्विट
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी देखील याबाबत ट्विट केलं आहे, ते म्हणाले, चित्रपट ‘खालिद का शिवाजी’ याचे प्रदर्शन माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांनी एक महिन्यासाठी स्थगित केले आहे. हे स्थगन महाराष्ट्र सरकारकडून चित्रपटातील ऐतिहासिक चुकीबाबत आणि सार्वजनिक सुव्यवस्थेवर होऊ शकणाऱ्या संभाव्य परिणामाबाबत व्यक्त केलेल्या चिंता लक्षात घेऊन करण्यात आले आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपट प्रमाणन अधिनियम, 1952 च्या कलम 6(2) अंतर्गत या चित्रपटाचे प्रमाणपत्र एक महिन्यासाठी स्थगित केले आहे.
महाराष्ट्र सरकारने चित्रपटामधील ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास आणि सांस्कृतिक भावना दुखावण्याबाबत शक्यता व्यक्त केली असून विशेषतः आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सव सणाच्या काळात समाजभावना दुखावल्या जाऊ नये या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
रोहित पवार यांचं ट्विट
राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना या चित्रपटाबद्दल बदलेल्या भूमिकेवरुन सवाल केला आहे.
रोहित पवार म्हणाले, मा. आशिष शेलार जी आपण ’खालिद का शिवाजी’ या चित्रपटाची प्रेस कॉन्फरन्समधे स्तुती केली व आपल्या विभागाने सर्व गोष्टी तपासून हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पाठवून या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म मिळवून दिला त्याबद्दल आपलं अभिनंदन!!
सांस्कृतिक विभागाचा मंत्री म्हणून आपलं काम चोख आहे, मात्र आता केवळ काही ठराविक संघटना याला विरोध करत आहेत म्हणून उद्या चित्रपट प्रदर्शित होत असताना सरकार आज दिग्दर्शकाला नोटीस पाठवतं, हे दुर्दैवी आहे. यावरून मा. आशिष जी या सरकारमधीलच काही लोकांकडून आपल्याला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे का, असा प्रश्न पडतो.
एखाद्या चित्रपटावर अनेकांचं भविष्य अवलंबून असतं, त्यामुळे आपण या दबावाला बळी न पडता या चित्रपटाच्या पाठीशी ठामपणे उभे रहाल व लवकरात लवकर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळेल, ही अपेक्षा!