मुंबई : सतत वादग्रस्त वक्तव्य, टिपण्णी आणि समाज माध्यमांवरील विविध पोस्टमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकणारी अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोशल मीडियावर शीख समुदायाची खलिस्तान्यांशी तुलना केल्याप्रकरणी नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा म्हणून कंगनानं ही याचिका दाखल केली असून त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी कंगानानं इन्स्टाग्रामवर शीख समुदायाबाबत काही आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. कंगनानं केलेल्या या वक्तव्यांमुळे शीख समाजातील लोकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली. मुंबई आणि दिल्लीतील विविध गुरुद्वारांच्या समित्यांचे सदस्य असलेले अॅड. अमरजितसिंग कुलवंतसिंग संधू, मनजिंदर सिंग सिरसा आणि जसपाल सिंग सिद्धू यांनी याप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे मुंबईतील खार पोलीस ठाण्यात कंगनाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जाणूनबुजून आणि द्वेषयुक्त पद्धतीनं तसेच धार्मिक भावना भडकावण्याच्या हेतूने भारतीय दंड संहितेच्या कलम 295 (अ) अंतर्गत मुंबई पोलिसांनी कंगनावर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करत कंगनानं अॅड. रिझवान सिद्धिकीमार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.


कलम 295 (अ) अंतर्गत किंवा अन्य कोणताही कलमातंर्गत याप्रकरणी खटला चालविता येणार नाही. सदर पोस्ट ही कृषी कायदे रद्द केल्यानंतर बंदी घालण्यात आलेल्या एका संघटनेच्याविरोधात होती. भारतीय राज्यघटनेच्या कलम 19(1)(अ) अन्वये ते तिच्या भाषा स्वातंत्र्याच्या मुलभूत अधिकारात मोडते. त्यामुळे तिच्या विरोधात नोंदविण्यात आलेला गुन्हा चुकीचा असल्याचा दावा करत तो रद्द करावा, अशी मागणी कंगनाने या याचिकेद्वारे केली आहे. आपण केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि मूलभूत अधिकाराचा वापर केल्याबद्दल द्वेषयुक्त भावनेने खटला चालवण्यात येत असल्याचेही कंगनानं यात म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे, याचिकाकर्त्यांपैकी एक अमृतपाल सिंह खालसा यांनी प्रतिबंधित खलिस्तानी संघटनेला उघडपणे पाठिंबा दिल्याबद्दल त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही कंगानानं या याचिकेत नमूद केलेलं आहे. त्यामुळे चुकीचे आणि बिनबुडाचे आरोप करत दाखल केलेला हा गुन्हा रद्द करून आपल्या कायदेशीर हक्क आणि स्वातंत्र्यांचे रक्षण करावे, अशी मागणीही कंगनाने या याचिकेतून केली आहे.


 काय होती पोस्ट?


"खलिस्तानी दहशतवादी शस्त्रास्त्रांच्या बळावर सरकारला प्रभावित करत असतील. पण हे विसरता कामा नये की, एका महिला पंतप्रधानानं या खलिस्तानींना चिरडल होतं." यात इंदिरा गांधी यांचा एक फोटो शेअर करत कंगनाने लिहिलं होते की, "इंदिरा गांधी यांनी आपल्या जीवची पर्वा न करता त्यांना मच्छरसारखे चिरडले आणि देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूच्या अनेक दशकानंतरही आजही ते त्यांच्या नावानं थरथर कापतात, त्यांना असाच गुरु पाहिजे", असं कंगनानं या पोस्टमध्ये लिहिलं होतं.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या :


Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : विकी-कतरिनाचं Kangana Ranaut ने केलं कौतुक, म्हणाली...


Kangana Ranaut : पंजाबमधील कार हल्ल्यानंतर कंगना मथुरेच्या मंदिरात नतमस्तक


जीवे मारण्याच्या धमकीनंतर कंगना म्हणते, सोनियाजी, तुम्हीही एक महिला, इंदिरा गांधीही दहशतवादाविरुद्ध लढल्या