Kangana Ranaut Files FIR : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यानंतर कंगनानं पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. याबाबतची माहिती कंगना राणौत हिने आपल्या सोशल मीडियावर सांगितली. सोबत एफआयआरची कॉपीही कंगनानं पोस्ट केली आहे.  अभिनेत्री कंगना राणौतनं इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलेय की, ‘मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्लेखोरांना माफ करायचं नाही. ही घटना कधीच विसरण्यासारखी नाही. यासारख्या घटनांमध्ये देशांतर्गत गद्दांराचा हात असतो. पैशांसाठी अथवा पदाच्या हव्यासासाठी भारताला कलंकित करण्याची एकही संधी सोडली नाही. देशातील काही अंतर्गत जयचंद आणि गद्दारांनी षडयंत रचत देशविरोधी शक्तींना मदत करत राहिलेत. त्याशिवाय अशा घटना घडत नाहीत, असं मी म्हटलं होतं. ‘
 
माझ्या या पोस्टवर मला वारंवार धमक्या मिळत आहेत. पंजाबमधील एका व्यक्तीने तर मला उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यासारख्या धमक्यांना मी घाबरत नाही. देशाविरोधात षडयंत्र रचणाऱ्यांविरोधात मी बोलतेय आणि यापुढेही बोलतच राहणार. मग ते कुणीही असो. नक्शली, विदेशात बसलेले दहशतवादी अथवा पंजाबला खलिस्थान करण्याचं स्वप्न पाहणारे... देशाविरोधात षडयंत्र करणाऱ्यांविरोधात मी बोलतच राहणार, असं कंगनानं म्हटलेय. 


लोकशाही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. सरकार कोणत्याही पक्षाचं असो, देशातील नागरिकांची अखंडता, एकात्मता आणि मूलभूत हक्कांचे संरक्षण आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे मुलभूत अधिकार बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिले आहेत. मी कोणत्याही जाती, धर्म अथव समूहाबद्दल आपत्तीजनक अथवा द्वेष निर्माण होईल, असं वक्तव्य केलं नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना विनंती करते की, तुम्हीही एक महिला आहात. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अखेरच्या क्षणापर्यंत दहशतवाद्याविरोधात लढल्या आहेत. कृपया, पंजाबमधील मुख्यमंत्र्यांना तुम्ही त्या व्यक्तीविरोधात कारवाईचे निर्देश द्यावेत अन् ताबडतोब कारवाई करण्याच आदेश द्यावेत, असं कंगनानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय. 






FIR बाबत माहिती देताना कंगना म्हणतेय की, ‘धमकी देणाऱ्याविरोधात मी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केली आहे.  आशा आहे की, पंजाब सरकार लवकरात लवकर कारवाई करेल. देश माझ्यासाठी सर्वात आधी आहे, त्यासाठी मला कोणताही त्याग करायचं असल्यास मी तयार आहे. पण मी घाबरलेय ना कधीच घाबरणार आहे. देशाच्या हितासाठी गद्दारांच्या विरोधात बोलतच राहणार.’