Kangana Ranaut : बॉलीवूडची पंगाक्विन कंगना रणौतसाठी (Kangana Ranaut) मागील काही वर्ष ही बरच कठीण गेली आहेत. तिचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले. 'धाकड'पासून 'थलायवी', 'तेजस' आणि 'चंद्रमुखी'पर्यंत एकाही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली असा एकही चित्रपट आला नाही. त्यानंतर सततच्या तिच्या फ्लॉप चित्रपटांवर कंगनाने भाष्य केलं आहे. त्यातच तिने स्वत:ची तुलना शाहरुख (Shah Rukh Khan) सोबतही केली आहे. कंगना रणौत लवकरच 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिने अभिनयासह दिग्दर्शनही केलं असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कंगनाला नुकतच भाजपकडून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. त्यामुळे आता या पंगाक्विनची राजकारणात एन्ट्री झाली आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं. त्यामुळे कंगना रणौत ही सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान कंगनाला तिच्या जन्मभूमीतूनच लोकसभेची उमेदवारी देण्यात आलीये. त्यामुळे बॉलीवूडची ही अभिनेत्री निवडणुकांच्या रिंगणात जनतेची मनं जिंकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कंगनाने नेमकं काय म्हटलं?
कंगनाने टाईम्स नाऊच्या समिटमध्ये याविषयी भाष्य केलं आहे. बॉक्स ऑफिसवर तिचे चित्रपट फ्लॉप होण्यावर बोलताना म्हटलं की, संपूर्ण जगात सातत्याने यशस्वी होईल, असा कोणी नाही. शाहरुख खानचे पहिले 10 चित्रपट चालले नाहीत. मग पठाणने काम केले. पहिली 7-8 वर्षे माझा कोणताही चित्रपट चालला नाही. त्यानंतर 'क्वीन' ने कमाई केली. मग 3-4 वर्षांनी 'मणिकर्णिका', आता पुढचा 'इमर्जन्सी' रिलीज होतोय, तुम्हाला माहीत नाही, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करेल, असा थेट दावा कंगनाने यावेळी केला आहे.
मी सुपरस्टारच्या पिढीतली शेवटची - कंगना रणौत
पुढे बोलताना कंगनाने बोलताना म्हटलं की, मी आणि शाहरुख या पिढीतले शेवटचे सुपरस्टार आहोत. ओटीटी स्टार तयार करु शकत नाही. आम्ही नावाजलेले चेहरे आहोत आणि देवाच्या कृपेने आम्हाला खूप मागणी आहे.पण केवळ कलेच्या क्षेत्रातच आम्हाला मग्न राहायचं नाहीये.
नेताजी बोस यांना पंतप्रधान का केले नाही?
कंगना रणौतने आझाद हिंद फौजचे संस्थापक असलेले महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान असल्याचे म्हटले. कंगनाने म्हटले की, एका व्यक्तीने आपले रक्त सांडून स्वातंत्र्य दिले. जर्मनी ते जपानपर्यंत स्वातंत्र्याची लढाई लढली. त्यांना देशाचे पंतप्रधान का केले नाही, अखेर ते कुठे अचानक अदृश्य झाले असा सवाल कंगनाने केला. जे तुरुंगात बसून टीव्ही पाहायचे ते सरकारमध्ये आले. आझाद हिंद फौजेच्या जवानांना कारवाईला सामोरे जावे लागले, अनेकजणांना गायब करण्यात आले असल्याचा दावाही कंगनाने केला.