Kailash Kher: 2025मध्ये गाण्याचे अनेक लाईव्ह शो (Live Show) झाले. काही हिट झाले तर, काही शोमध्ये चेंगराचेंगरी आणि गोंधळ उडण्याचे प्रकार घडले. नुकतंच सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचा ग्वाल्हेरमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट पार पडला. हा कॉन्सर्ट गुरूवारी पार पडला. मात्र, या कॉन्सर्टमध्ये मिठाचा पडला. रात्री कॉन्सर्टमध्ये चाहत्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. चाहत्यांनी बॅरिकेड्स तोडून थेट कैलाश खेर यांच्याकडे धाव घेतली. यावेळी संपूर्ण वातावरण नियंत्रणाबाहेर गेले होते. चाहत्यांनी घातलेल्या गोंधळानंतर कैलाश खेर प्रचंड संतापले. परिणामी कार्यक्रम तातडीने थांबवण्यात आला. हा शो अर्ध्यातच थांबला.
कैलाश खेर यांच्या लाईव्ह शोमध्ये नेमकं घडलं?
भारतरत्न आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ग्वाल्हेरमधील मैदानावर भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कैलाश खेर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी या कार्यक्रमात लोकप्रिय आणि सदाबहार गाणी सादर केली. सुरूवातीला सगळं काही सुरळीत होतं. प्रेक्षकांनी देखील या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला. पण जसजसा कार्यक्रम पुढे गेला, तसतसं प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. चाहते तसेच प्रेक्षकवर्ग थेट स्टेजवर गेले. यामुळे कार्यक्रमादरम्यान काही वेळ गोंधळ उडाला. तसेच कलाकारांसह आयोजकांनाही मोठा त्रास झाला.
काही अति उत्साही चाहत्यांनी बॅरिकेड्स तोडले. तसेच स्टेजवर जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे वाद्यवृंद आणि तांत्रिक उपकरणांना धोका निर्माण झाला होता. चाहत्यांच्या या गैरप्रकारामुळे कैलाश खेर संतापले. त्यांनी गाणं तातडीने थांबवलं. तसेच चाहत्यांना खडेबोल सुनावले. 'आम्ही प्रेक्षकांचा आदर करतो. पण तुम्ही जनावरांसारखं का वागताय? कृपया असं करू नका.. असं वागू नका. जर कुणीही स्टेजवर किंवा वाद्यांच्या जवळ आले तर, आम्ही लगेच कार्यक्रम थांबवू', असं कैलाश खेर म्हणाले.
या संपूर्ण प्रकारानंतर कैलाश खेर यांनी पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांना बोलावून घेतले. तसेच त्यांना परिस्थिती हाताळण्यासाठी विनंती केली. मात्र, यावेळी सुरक्षा व्यवस्था कमी पडत होती. यामुळे त्यांना कार्यक्रम अर्ध्यातच सोडावा लागला. कैलाश खेर थेट निघून गेले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी देखील कमेंटद्वारे प्रेक्षकवर्गाला फटकारले.