मुंबई :अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर चर्चा सुरु आहे. दिग्दर्शक अभिनव कश्यपसह अनेक चाहत्यांनी सलमान खानवर आरोप केले आहेत. यानंतर आता अभिनेत्री जिया खानच्या आईने देखील सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्री जिया खाननं 2013 मध्ये आत्महत्या केली होती. आता सुशांतच्या आत्महत्येनंतर जियाची आई राबिया अमीन यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत सलमान खानवर आरोप केले आहेत.


या व्हिडीओमध्ये राबिया यांनी म्हटलं आहे की, 'माझ्या संवेदना सुशांत सिंहच्या कुटुंबासोबत आहेत. हे हृदय पिळवटून टाकणारं असतं. ही काही मस्करीची गोष्ट नाही. बॉलिवूडला बदलावं लागेल. बॉलिवूडला जाग आली पाहिजे. एखाद्याची टर उडवणं पूर्णपणे बंद करावं. कारण थट्टा उडवणं ही एक प्रकारची हत्या करण्यासारखं आहे.'


राबिया यांनी आरोप केला आहे की, 'जे काही होत आहे त्याने मला 2015 ची आठवण करून दिली. जियाच्या आत्महत्येनंतर सीबीआय अधिकाऱ्यांना काही पुरावे मिळाले होते. यासंबंधी त्यांनी मला लंडनहून भारतात भेटायला बोलावलं होतं. मी त्यांना भेटले तेव्हा ते म्हणाले की, सलमान खानचा फोन आला होता. तो दररोज फोन करतो आणि पैशांबद्दल बोलतो. तो अधिकाऱ्यांना सांगतो की मुलाला काही विचारू नका, त्याला हात लावू नका, त्याची चौकशी करू नका. मग आम्ही काय करू शकतो.'

राबिया यांनी म्हटलं की, तो अधिकारीही या सर्व गोष्टींमुळे त्रासलेला आणि नाराज दिसत होता. मग मी ही गोष्ट दिल्लीतील उच्चाधिकाऱ्यांपर्यंत नेली. मी याबद्दल तक्रारही केली.  मी सर्वांना सांगू इच्छिते की, या विरोधात उभे रहा, आंदोलन करा, लढा आणि बॉलिवूडमधील या वागणूकीला वेळीच थांबवा, असं देखील राबिया यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा- अभिनव कश्यपने देखील केला होता सलमान खान आरोप

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेकांनी बॉलिवूडमधील घराण्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अनुराग कश्यपचा भाऊ आणि दबंगचा दिग्दर्शक अभिनव कश्यपने फेसबुकवर पोस्ट लिहून बॉलिवूड कंपूवर टीका केली होती. त्याचा सगळा रोख सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियावर होता. सलमान खानमुळे काम मिळणं बंद झाल्याचा आरोप त्याने केला आहे. दबंग तुफान हिट झाल्यावर अभिनव दंबग- 2 चं देखील दिग्दर्शन करणार होता. पण काही कारणाने त्याने नकार दिला होता. अभिनवने सलमान खान आणि त्याच्या कुटुबियांवर गंभीर आरोप केले आहेत. दबंग सिनेमाच्या रिलीजनंतर सलमान खानने सोहेल खान आणि अरबाज खान यांच्यासोबत मिळून 'बेशरम' सिनेमा रिलीज होणे थांबवण्यापासून ते सिनेमाचे राईट्सबाबतची अनेक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न  केल्या, असं अभिनवने म्हटलं होतं.

अभिनवने लिहिलं होतं की, माझा अनुभव या सर्व गोष्टींपेक्षा वेगळा नाही. मलाही शोषणाचा सामना करावा लागला आहे. दहा वर्षांपूर्वी दबंग 2 मधून मी बाहेर पडण्याचे कारण म्हणजे अरबाज खान आणि सोहेल खान यांनी माझ्या कारकिर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी खूप घाबरलो. अरबाजने खाने माझा श्री अष्टाविनायक फिल्म्समधील दुसरा प्रोजेक्टमध्ये अडथळे निर्माण केले. माझा कारकिर्दिवर मोठा परिणाम होण्याची धमकीही मला देण्यात आली. त्यानंतर मी श्री अष्टाविनायक फिल्म्सला पैसे परत दिले आणि त्यानंतर मी व्हायकॉम पिक्चर्सकडे गेलो. तिथेही तोच अनुभव आला. त्यानंतर रिलायन्स एंटरटेनमेंट मला वाचवण्यासाठी पुढे आली आणि आम्ही भागीदारीत 'बेशरम' चित्रपटावर काम केले, असं अभिनवनं फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.