MUMBAI: बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरीच्या पत्नी हबीबा जाफरी यांची तब्बल 16 कोटी 24 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात मुंबई महापालिकेच्या के-नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यासह सहा जणांविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर महापालिकेने महेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. (Javed Jaffrey Wife Fraud Case)

Continues below advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, बांद्र्यातील एका पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे आमिष हबीबा जाफरी यांना दाखवण्यात आले होते. या व्यवहारासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. या कथित फसवणुकीत हबीबा जाफरी यांचे 16.24 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

निलंबनाचा आदेश जारी, आरोपी फरार?

या प्रकरणाची गंभीर दखल घेत बृहन्मुंबई महानगरपालिकेने महेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. शुक्रवारी निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला असून रविवारी तो बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर महेश पाटील फरार  असल्याचेही सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून आरोपींच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Continues below advertisement

महेश पाटील यांचे नाव यापूर्वीही वादात

महेश पाटील यांचे नाव यापूर्वीही अनेक वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत आले होते. 2023 मध्ये जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरणात त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या आरोपांमुळे त्यांना महापालिकेकडून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. आता जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांच्या कथित 16.24 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणामुळे महेश पाटील पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणामुळे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.