मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझम विरोधात भडका उडाला आहे. बॉलिवूडची टोळी आऊटसायडर्सना कशी त्रास देते? कशी हुकुमत गाजवते? यावर रोजची चर्चा चालू आहे. काही दिवसांपूर्वी मराठीतील दिग्दर्शक, निर्माते आणि मराठी तारकाचे प्रस्तुतकर्ता महेश टिळेकर यांनी मराठीतही आऊटसायडरला आऊटसाईड करण्याचे प्रयत्न होतात असे आरोप केले. अर्थात मराठीत काय हा मुद्दा आहेच. याबद्दल संगीतकार, दिग्दर्शक, निर्माता अवधूत गुप्ते याने खास एबीपी माझाला दिलेल्या वेब इंटरव्ह्यूमध्ये मराठीमध्ये नेमकं काय चालू आहे ते मार्मिक पद्धतीने सांगितलं.


अवधूत गुप्ते यांच्याकडे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं. अवधूत हे मराठीतले दिग्दर्शक, गायक, संगीतकार आहेत. मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्ष ते काम करत आहेत. सध्या सुशांत सिंह राजपूतवरुन बॉलिवूड ढवळून निघत असताना, मराठीमध्ये काय स्थिती आहे याचा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. यावर बोलताना अवधूत म्हणाले की, "मराठीमध्ये नेपोटिझम, आऊटसायडर्सना ट्रीटमेंट नीट न देणं हा आता मुद्दा नाही. खरंतर मराठी इंडस्ट्री खूप लहान आहे. आपल्याकडे नेपोटिझम यायला अजून भरपूर अवकाश आहे. इथे जो येतो तो त्याच्या दमावर शिकतो आणि मोठा होतो. अजून आपल्याकडे घराणेशाही नाहीय. शिवाय आपण मराठी इंडस्ट्री ही एक कुटुंब मानतो. त्यामुळे इथे येणाऱ्या आऊटसायडरकडे दुजाभाव म्हणून पाहिलं जातं असं अजिबात नाही. कारण आपल्याकडे चांगलं काम होतं. सिनेमा लक्षात घेऊन काम होतं. आपली इंडस्ट्री खूप लहान आहे. नेपोटिझम, आऊटसायडर्सचे प्रश्न असे मुद्दे जे आता हिंदीत चालू आहे ते आपल्याकडे यायला खूप अवकाश आहे."


सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडला आता अनेक लोक बुली-वूड म्हणू लागले आहेत. सुशांतच्या आत्महत्येला हिंदी इंडस्ट्रीतली बडी नावं कारणीभूत असल्याचा सूर उमटत असतानाच रियाच्या वडिलांनी बिहारमध्ये रियाविरोधात तक्रार दाखल करुन ती सुशांतला त्रास देत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे.


WEB EXCLUSIVE | गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते येतोय निवेदकाच्या भूमिकेत, नवी उमेद नवी भरारी कार्यक्रम तुमच्या भेटीला!