नागपूर : कलाविश्वात आपल्या योगदानानं प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार रामलक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचं शनिवारी निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. नागपुरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विजय पाटील यांना मधुमेहाचा त्रास होता, मागील काही दिवसांपासून त्यांना अशक्तपणाही जाणवत होता. मागील वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापासूनच ते नागपूरमध्ये राहत होते, एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांच्या मुलानं ही माहिती दिली. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच कलाविश्वातून अनेकांनीच या कलाकाराला श्रद्धांजली वाहिली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करत विजय पाटील यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. तर, चांगल्या मनाचा माणूस गेला अशा शब्दांत ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनीही पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.
'पांडू हवालदार', 'आली अंगावर', 'राम राम गंगाराम', 'पथ्थर के फुल', 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है', 'हमसे बढकर कौन' या आणि अशा जवळपास 75 पेक्षा जास्त चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं होतं. आजही त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांना चाहत्यांची कमालीची पसंती मिळते.