मुंबई : आण्णाभाऊ साठे हे काळापुढचे साहित्यिक होते. म्हणूनच त्यांच्या साहित्यकृतीची भुरळ आजही अनेक सिनेनिर्मात्यांना पडते. खरंतर त्यांच्या आवडी या कथेवर बेतलेला 'इभ्रत' हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होणार होता. पण या कथेच्या हक्कांवरुन नव्याने वाद उद्भवला आहे. तो वाटाघाटींनी सोडवता न आल्याने आता हा वाद कोर्टात गेला आहे.


'इभ्रत' हा चित्रपट आण्णाभाऊ साठे यांच्या 'आवडी' या कथेवर बेतलेला आहे. प्रवीण क्षीरसागर दिग्दर्शित या चित्रपटात संजय शेजवल आणि शिल्पा ठाकरे यांच्या भूमिका आहेत. सिनेमाचं प्रमोशनही आता जोर धरु लागलं होतं. तोवर कथेच्या हक्कांवरुन सतीश वाघेला यांनी या सिनेमाच्या निर्मात्यांना कोर्टात खेचलं आहे. वाघेला यांच्या मते 'आवडी' या कथेचे हक्क आण्णाभाऊ यांच्या सून सावित्रीमाई साठे यांनी त्यांना दिले आहेत. तर 'इभ्रत'च्या निर्मात्यांचा मात्र हे हक्क आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. याबद्दल बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणाले, 'हा वाद आता यायाचं कारण नव्हतं. आमच्या निर्मात्याकडे या सिनेमाचे हक्क आहेत. सावित्री यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. असं असताना वाघेला यांनी या कथेचे हक्क आपल्याकडे असल्याचं सांगणं अनाकलनीय आहे. सावित्री यांनी त्यांनाही एका कथेचे हक्क दिले आहेत पण ती कथा वेगळी आहे. असो. सध्या हे प्रकरण कोर्टात असल्यामुळे कोर्ट या सर्व प्रकाराची शहानिशा करुन निर्णय देईल.''


या वादाबाबत 21 तारखेलाच कोर्ट सुनावणी करणार आहे. त्यामुळे या शुक्रवारी म्हणजे 21 फेब्रुवारीला असलेलं या सिनेमाचं प्रदर्शन आता पुढे ढकलण्यात येणार आहे. कोर्टाचा निकाल जर 'इभ्रत'च्या बाजूने लागला तर आता हा चित्रपट मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शुक्रवारी प्रदर्शित करायचा विचार निर्माते करत आहेत.


वादामुळे नुकसान
या कोर्टातल्या वादामुळे निर्मात्यांना निष्कारण 25 ते 30 लाखांचं नुकसान झाल्याचा दावा दिग्दर्शक करतात. सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी सिनेमा वितरकांना पैसे द्यावे लागतात. तरच सिनेमा वितरित होऊ शकतो. शिवाय सर्व माध्यमांत जाहिरात करावी लागते. त्यावर खर्च करुनही सिनेमा पुढे गेल्याने आता पुढे जेव्हा सिनेमाची तारीख ठरेल तेव्हा पुन्हा हा खर्च करावा लागणार आहे.