I Am Sorry : आजच्या युगात काही इंग्रजी शब्द आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनले आहेत. बऱ्याचदा अनाहुतपणे हे शब्द आपल्या दैनंदिन जीवनात वापरले जातात. 'सॅारी' हा असाच एक शब्द आहे, जो आज अगदी आपल्या रोजच्या जीवनशैलीचा भाग बनला आहे. आता याच शब्दाला अनुसरून एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं शीर्षक आहे 'आय एम सॅारी'. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. रसिकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या 'आय एम सॅारी'च्या ट्रेलरला फार कमी अवधीमध्ये भरभरून लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहेत. 13 मे रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 


एम. जे. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या 'आय एम सॅारी' या चित्रपटाची निर्मिती अब्दुल मजीद चिकटे यांनी केली आहे. बांधकाम व्यावसायिक आणि समाजसेवक असलेल्या अब्दुल मजीद चिकटे यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून कार्यकारी निर्माता रविंद्र जाधव यांनी देखील या सिनेमासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल एन्टरटेन्मेंटच्या सहयोगानं हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन दीपक भागवत यांनी केलं आहे. यापूर्वी '३:५६ किल्लारी' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे दीपक भागवत 'आय एम सॅारी' माध्यमातून पुन्हा एकदा काहीसा वेगळा जॅानर घेऊन आले आहेत. 'आय एम सॅारी' मध्ये काय पहायला मिळणार याची झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळत असल्यानं या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाचं कथानक आपल्या दैनंदिन जीवनाशी मिळतंजुळतं असल्यानं प्रत्येक प्रेक्षकाला ते आपलंसं वाटेल असं मत दिग्दर्शक दीपक भागवत यांनी व्यक्त केलं आहे. एका नव्या कोऱ्या जोडीच्या माध्यमातून 'आय एम सॅारी'ची स्टोरी प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, या चित्रपटासाठी कलाकारांइतकीच प्रत्येक विभागातील घटकानं मेहनत घेत आपलं १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न केल्याचंही भागवत म्हणाले. मराठी चित्रपटांसोबतच सन टीव्हीवरील जाऊ नको दूर बाबा तसेच 'तेरी लाडली मैं' या हिंदी मालिकेत झळकलेली मयूरी कापडणे यात मुख्य भूमिकेत दिसणार असून तिच्या जोडीला रियाज मुलाणी आहे. रियाज सध्या झी मराठीवरील मन झालं बजिंद मालिकेत काम करत आहे. याखेरीज अनुराग शर्मा, नेहा तिवारी, राजन ताम्हाणे, समीरा गुजर, कौस्तुभ पाध्ये, श्रीकांत कामत, राजेश लाटकर, भगरे गुरुजी, अस्मिता खटखटे, स्वाती पानसरे, सुषमा सीनलकर, बाल कलाकार, ओमकार जाधव, सानवी चव्हाण आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. 


डिओपी ओम नारायण यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून चैत्राली डोंगरे यांनी कॅास्च्युम डिझायनर, कास्टिंग डिरेक्टर आणि प्रोडक्शनची जबाबदारी सांभाळली आहे. जावेद अली, आनंदी जोशी, रिशिका मुखर्जी, पार्वथी नायर, शुभम दिवेकर, सबाली, फरहान साबरी, कॅप्टीव्ह या गायकांच्या सुमधूर आवाजात संगीतकार सॅम ए. आर. यांनी 'आय एम सॅारी'मधील गीतांना स्वरसाज चढवला आहे. चिफ साऊंड डिझाईनर प्रशांत कांबळे असून, संतोष फुटाणे कला दिग्दर्शक आहे. पार्श्वसंगीत गॅब्रेल सॅलोमोनी यांनी दिलं असून, राजन राजन यांनी डिआय केलं आहे. मेकअप नागेश कस्तुरी यांनी केला असून, अंकुष बोराडकर अॅरेंजर आहेत. अमोल चाळखुरे चिफ असिस्टंट दिग्दर्शक असून किसन चव्हाण असिस्टंट दिग्दर्शक आहेत.


महत्वाच्या बातम्या :