Marathi Thriller Movie: भारतीय चित्रपटसृष्टीत क्वचितच अशा विषयांवर चित्रपट तयार होतात, जे वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषा पूर्णपणे मिटवतात. लवकरच प्रेक्षकांसमोर येत असलेला ‘ह्युमन कोकेन’ हा तसाच एक धाडसी, सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना मानवी तस्करी, सायबर सिंडिकेट आणि ड्रग कार्टेलच्या काळोख्या, भयानक आणि अनाकलनीय जगात घेऊन जाणार आहे.

Continues below advertisement

या चित्रपटात अभिनेता पुष्कर जोग पुन्हा एकदा एका तीव्र, आव्हानात्मक आणि भावनिक भूमिकेत दिसणार आहे. 'जबरदस्त' या मराठी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारा आणि ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सिझनमधील लोकप्रिय रनर-अप ठरलेला पुष्कर, 'व्हिक्टोरिया – एक रहस्य'च्या यशानंतर आता एका पूर्णपणे वेगळ्या आणि गडद विषयावर झळकणार आहे.

सायकोलॉजिकल थ्रिलरविषयी काय म्हणाला पुष्कर?

पुष्करने या भूमिकेबद्दल बोलताना सांगितलं, “‘ह्युमन कोकेन’ हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रोजेक्ट आहे. या पात्रासाठी मी अनेक वर्कशॉप्स केल्या, कारण एका गुन्हेगारी जाळ्यात अडकलेल्या माणसाच्या मनोवस्थेचं वास्तव दाखवणं सोपं नव्हतं. हा अनुभव थरारक आणि भावनिक दोन्ही होता.”

Continues below advertisement

दमदार स्टारकास्ट

चित्रपटात इशिता राज, सिद्धांत कपूर, जाकीर हुसेन आणि काही ब्रिटिश कलाकारांची दमदार स्टारकास्ट आहे. त्यामुळे या चित्रपटाला एक आंतरराष्ट्रीय लुक प्राप्त झाला आहे. दिग्दर्शक सरीम मोमिन यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. निर्मिती स्कार्लेट स्लेट स्टुडिओज, वाइनलाइट लिमिटेड, आणि टेक्स्टस्टेप सर्व्हिसेस प्रा. लि. यांनी गूजबंप्स एंटरटेनमेंटच्या सहकार्याने केली आहे.

ची तेंग जू आणि हरीत देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचं छायाचित्रण सोपन पुरंदरे, संपादन संदीप फ्रान्सिस, संगीत क्षितिज तारे, आणि नृत्यदिग्दर्शन पवन शेट्टी व खालिद शेख यांनी केलं आहे.

कधी होणार प्रदर्शित?

‘ह्युमन कोकेन’चं चित्रीकरण युनायटेड किंगडममध्ये करण्यात आलं असून हा चित्रपट केवळ एक थ्रिलर नसून समाजातील काळ्या बाजूचं धक्कादायक प्रतिबिंब आहे. मानवी तस्करी आणि ड्रग सिंडिकेटच्या वास्तवावर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ठरण्याची शक्यता आहे.‘ह्युमन कोकेन’ हा सिनेमा १६ जानेवारी २०२६ रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, त्याची चर्चा आधीपासूनच सोशल मीडियावर सुरू झाली आहे. या वर्षातील सर्वात चर्चित आणि धाडसी मराठी थ्रिलर ठरेल, अशी अपेक्षा सिनेसृष्टीत व्यक्त केली जात आहे.