Hukki Marathi Movie First Look: हॉरर आणि कॉमेडी या दोन्ही घटकांचा धमाल संगम असलेला मराठी चित्रपट ‘हुक्की’ प्रेक्षकांसमोर लवकरच येत आहे. या चित्रपटाचा पहिला लुक नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने (Varun Dhavan) स्वतःच्या सोशल मीडियावरून ‘हुक्की’चा फर्स्ट लुक शेअर करत या मराठी सिनेमाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता प्रथमेश परब आणि विनोदाचा बादशहा पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी या दोघांची जोडी या सिनेमात धमाल करणार आहे.
मित्रांच्या आयुष्याभोवती फिरणारा कॉमेडी भयपट
‘हुक्की’ या चित्रपटाची कथा चार मित्रांच्या आयुष्याभोवती फिरते. सुरुवातीला त्यांच्या आयुष्यातील हसरे क्षण दिसतात, पण नंतर एक भयावह रात्रीची सुरूवात होते आणि सगळंच उलथून पडतं. या प्रवासात भय आणि विनोदाचं उत्तम मिश्रण पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता प्रथमेश परब आणि विनोदाचा बादशहा पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी या दोघांची जोडी या सिनेमात धमाल करणार आहे. त्यांच्या सोबत रावी किशोर, प्रशांत मोहिते, महेश पाटील, आरती चौबल, वर्षा धांदले, मोहक कंसारा आणि पंकज विष्णू यांच्यासारखे ताकदवान कलाकार झळकणार आहेत.
या चित्रपटाची निर्मिती मॅजिक स्वान स्टुडिओज आणि एनएमआर मुव्हीज यांच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. निर्माते नितीन रोकडे, सुनंदा काळुसकर, विनायक पाष्टे, श्वेता संजय ठाकरे आणि सहनिर्माते सुधीर खोत तसेच रईस खान यांनी हा प्रकल्प उभा केला आहे. विशेष म्हणजे, कथालेखनासोबतच दिग्दर्शनाची जबाबदारीही नितीन रोकडे यांनी सांभाळली आहे.
भय-विनोदाचा अफलातून खेळ
फर्स्ट लुक पाहिल्यावर प्रेक्षकांना लगेचच लक्षात येतं की ‘हुक्की’चा टोन काहीसा वेगळा आहे. लालभडक डोळ्यांचा कावळा, समुद्रकिनाऱ्याचं दृश्य आणि होडी ओढणारे कोळी अशा सिनेमॅटिक सीनपासून फर्स्ट लुकची सुरूवात होते. लगेचच चार मित्रांची चौकडी दिसते, ज्यांना “फोर लूझर्स” असं म्हटलं जातं. त्या नंतर सुरू होते एक थरारक रात्र आणि भय-विनोदाचा अफलातून खेळ.
दिग्दर्शक नितीन रोकडे यांनी संदीप कुमार रॉय आणि मधुलीता दास यांच्यासह कथा-पटकथा लिहिली असून, निनाद पाठक आणि संजय नवगिरे यांनीही लेखनात योगदान दिलं आहे. संगीत क्षेत्रात राघवेंद्र व्ही आणि प्रफुल-स्वप्नील यांच्या जोडीने सुरेलता आणली आहे. विशेष म्हणजे, दक्षिणेतील प्रसिद्ध संगीतकार राघवेंद्र व्ही ‘हुक्की’द्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.
या चित्रपटात फारुख खान यांची सिनेमॅटोग्राफी, संतोष गणपत पालवणकर आणि इमरान मालगुणकर यांचे नृत्यदिग्दर्शन, तर संष कुमार आणि नितीन रोकडे यांनी डिझाईन केलेली थरारक साहसी दृश्ये विशेष आकर्षण ठरणार आहेत. एकूणच, ‘हुक्की’ हा चित्रपट भय, विनोद आणि मैत्री यांचा अजब संगम असलेला, प्रेक्षकांना हसवतानाच थरारून सोडणारा ठरणार आहे.