JK Rowling Death Threat: भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोराने स्टेजवर चढून त्यांच्या मानेवर चाकूने वार केले. अनेक सेलिब्रिटींनी सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. ‘हॅरी पॉटर’च्या (Harry Potter) लेखिका जेके रोलिंग (JK Rowling) यांनी रश्दी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला होता. त्यांनी सलमान रश्दींच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. तेव्हापासून, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत.


लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर जेके रोलिंग यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध व्यक्त केला होता. त्यांनी ट्विट करत लिहिले की, 'या घडल्या प्रकारामुळे खूप दुःख झाले आहे. लवकर बरे व्हा.' जेके रोलिंगच्या ट्विटला उत्तर देताना एका यूजरने धमकीच्या सुरात लिहिले की, 'काळजी करू नका, पुढचा नंबर तुमचाच आहे.' या धमकीच्या ट्विटचा स्क्रीनशॉट जेके रोलिंग यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.


पाहा पोस्ट :



‘हॅरी पॉटर’च्या लेखिका जेके रोलिंग यांनी या धमकीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी ट्विटरवर अनेक स्क्रीनशॉट शेअर करून प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी लिहिले की, 'ट्विटर तुमची काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत, की नाही? तुम्ही एखाद्या व्यक्ती किंवा लोकांच्या समूहाविरुद्ध हिंसेची धमकी देऊ शकत नाही.’  


सलमान रश्दी यांच्यावर हल्ला


जगविख्यात लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये हल्ला झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यांना चाकूने वार करून जखमी करण्यात आले आहे. लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्क येथे हल्ला झाला आहे. दरम्यान काही प्रत्यक्षदर्शींनी सलमान रश्दी यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचे ट्वीट केले असून, एक घटनास्थळाचा व्हिडीओही यावेळी पोस्ट करण्यात आला आहे. दरम्यान सुरक्षा दलांनी हल्लेखोराला पकडण्यापूर्वी रश्दी यांच्यावर अनेक वेळा वार करण्यात आले होते.


त्यानंतर प्रेक्षकांमधील काही सदस्य मंचावर देखील गेले. या हल्ल्यात जखमी झालेल्या सलमान रश्दी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान न्यूयॉर्कच्या गव्हर्नर यांनी सलमान त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती दिली आहे.


कोण आहेत सलमान रश्दी?


भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असलेले सलमान रश्दी गेल्या 20 वर्षांपासून अमेरिकेत राहत आहेत. त्यांची पहिली कादंबरी 1975मध्ये प्रदर्शित झाली होती. त्यांना त्यांच्या ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’साठी (1981) बुकर पारितोषिक देखील मिळाले. ही कादंबरी आधुनिक भारताबद्दल आहे. त्यांचं चौथं पुस्तक, ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’मुळे (1988) त्यांना वादात अडकावे लागले होते. सलमान रश्दी यांना त्यांच्या 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या पुस्तकासाठी त्यांना अनेक धमक्या देखील आल्या आहेत. या पुस्तकावर 1988 पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पुस्तकात इस्लाम धर्माची निंदा केल्याचा आरोप करण्यात आला होता. या वादानंतर आलेल्या धमक्यांना न जुमानता त्यांनी 1990च्या दशकात अनेक कादंबऱ्या लिहिल्या. 2007 मध्ये इंग्लंडच्या राणी दुसऱ्या एलिझाबेथ यांनी त्यांना साहित्य क्षेत्रातील सेवांसाठी 'सर' ही पदवी प्रदान केली होती.


इतर महत्त्वाच्या बातम्या-