Manoj Bajpayee Birthday : बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) आज (23 एप्रिल) आपला 53वा वाढदिवस साजरा करत आहे. मनोज वाजपेयी जरी आज चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा बनले असले, तरी त्यांचा हा प्रवास वाटतो तितका सोपा अजिबात नव्हता. बिहारच्या पश्चिम चंपारणमधील बेलवा या छोट्याशा गावात जन्मलेल्या मनोजवाजपेयींनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष केला. मनोज यांचा जन्म 23 एप्रिल 1969मध्ये पश्चिम चंपारण जिल्ह्यातील नरकटियागंज या बेलवा या छोट्याशा गावात झाला.


लहान असताना मनोज यांना चित्रपट पाहण्याची आवड होती. एकदा त्यांनी अमिताभ बच्चन अभिनित ‘जंजीर’ हा चित्रपट पाहिला. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा अभिनय पाहून मनोज वाजपेयी इतके प्रभावित झाले की, आपणही आता अभिनेताच व्हायचं हे त्यांनी मनाशी पक्क केलं. अभिनेता व्हायचं ठरवलं, पण सुरुवात कुठून करायची याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. यासाठी त्यांनी साहित्याचा आधार घेतला.


मुलाने डॉक्टर व्हावे, वडिलांची इच्छा!


अभिनयाच्या वेडापायी मनोज वाजपेयी यांनी वडिलांना न सांगता दिल्लीला रवाना होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाचा वडिलांना खूप राग आला होता. त्याचवेळी आपण यासाठी कोणतीही मदत करणार नाही, त्याला त्याचा खर्च स्वतः करावा लागेल, असे त्यांच्या वडिलांनी म्हटले होते. आपल्या मुलाने शिकून मोठे डॉक्टर व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, आपण अभिनय करणार आहोत, हे वडिलांना सांगितल्यावर त्यांना अवघे 200 रुपये घरातून मिळाले होते.


या दरम्यान ते कामासाठी खूप संघर्ष करत होते. जवळचे पैसे देखील संपत आले होते. अशावेळी एक वडापाव विकत घेणे देखील त्यांना कठीण वाटत होते. अशा परिस्थितीत त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार देखील आला होता. मात्र, या काळात त्यांचे मित्र त्यांच्या मदतीला होते.


मालिकेतून केली करिअरची सुरुवात!


1995 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या 'स्वाभिमान' या मालिकेत काम करून मनोज वाजपेयी यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. शेखर कपूरच्या प्रसिद्ध चित्रपट 'बँडिट क्वीन'मध्ये मनोज वाजपेयी रुपेरी पडद्यावर झळकले होते, ज्यामध्ये मनोज वाजपेयी यांनी लुटारू मानसिंगची भूमिका साकारली होती. मात्र, राम गोपाल वर्मा यांच्या 'सत्या' चित्रपटातील ‘भिखू म्हात्रे’च्या भूमिकेने त्यांना तुफान प्रसिद्धी मिळवून दिली.


मनोज वाजपेयी यांच्या कारकिर्दीतील दुसरा यशस्वी चित्रपट म्हणजे 'शूल' ज्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार आणि गुंडगिरीशी लढा देणार्‍या एका प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. मनोज बाजपेयी व्यावसायिक चित्रपटांऐवजी आउट ऑफ द बॉक्स चित्रपट करण्यासाठी ओळखले जातात. मनोज वाजपेयी यांना त्यांच्या 'सत्या' आणि 'शूल'साठी दोनदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.


हेही वाचा :