Gharat Ganpati Movie Review :  प्रत्येक सणांचं जितकं पौराणिक, सांस्कृतिक महत्त्व असतं, त्याहून किंबहुना थोडं अधिक त्या सणांचं भावनिक महत्त्व असतं. त्यातच काही सण हे नात्यांचा उत्सव करणारे असतात. त्यामुळे त्या सणाची अगदी वर्षभर प्रत्येकजण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. असाच प्रत्येकाच्या आवडीचा सण म्हणजे गौरी-गणपती. दीड, पाच, सात आणि दहा दिवसांचा हा सण प्रत्येकासाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. अनेक दुरावलेली किंवा वरदेखी असणारी अनेक नाती, या सणाच्या निमित्ताने एकत्र येऊन तो उत्सव मनोभावे संपन्न करतात. अशाच एका कुटुंबाच्या नात्याची गोष्ट असणारा 'घरत गणपती' (Gharat Ganpati) मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 


भूषण प्रधान, निकिता दत्ता, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी गोखले या मंडळींचा एक नवा सिनेमा सध्या सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तुमच्या आमच्या घरातली गोष्ट सांगणाऱ्या घरत कुटुंबाची गोष्ट नवज्योत बांदिवडेकर या दिग्दर्शकाने प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. पॅनरोमा स्टुडिओ निर्मित, नवज्योत बांदिवडेकर दिग्दर्शित आणि निर्मित हा सिनेमा 26 जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आला. नात्यांची वीण ही पिढ्यांनुसार बदलली आहे. आपल्या आज्जी आजोबांच्या पिढीने सण हे परंपरा म्हणून, आपल्या आईवडिलांच्या पिढीने सण हे जबाबदारी म्हणून आणि आपल्या पिढीने सण हे आनंद आणि उत्सव म्हणून पाहिले आहेत आणि आजही तिच स्थिती आहे. याच परंपरा, जबाबदारी आणि आनंदाचा मेळ घालणारी ही प्रत्येकाच्या घरातली गोष्ट आहे. 


सिनेमाची गोष्ट कशी आहे?


ही कथा गणपतीची आहे. त्यातच कोकणातले गणपती म्हणजे प्रेक्षकांच्या विशेष आवडीचे आणि आपुलकीचे. त्यामुळे हा सोहळा जास्त जवळचा होता. विशेष म्हणजे कोणतीही लांबलचक कथा न सांगता थेट विषयाला हा सिनेमा येतो. त्यातच एक नात्यांमधल्या रुसव्या फुगव्यांमध्ये एक हळुवार फुलणारी प्रेमकथा पाहायला मिळते. दिल्लीची मुलगी जेव्हा कोकणात गणपतीसाठी येते, तेव्हा तिची असणारी उत्सुकता, घरातल्यांची मनं जिंकण्यासाठी सुरु असलेली धडपड हे सारं पाहताना फार कौतुक वाटतं. त्याचप्रमाणे घरतांच्या स्त्रियांना त्यांच्या बाईपणाची ओळख करुन देतानाही तिने पत्कारलेला विरोध आणि काहीच दिवसांत आपलसं करणारा तिचा प्रवास हा पाहतानाही गोड वाटतो. निकिता दत्ता ही क्रिती अहुजा ही भूमिका साकारत आहे. कोकणातल्या मराठमोळ्या केतन घरत या मुलाच्या प्रेमात ती पडते. केतन घरत ही भूमिका अभिनेता भूषण प्रधान याने साकारली आहे. 


सगळ्यांचा लाडका, भावडांना आपलंस करणारा, आईवर विशेष प्रेम असणारा असा हा केतन जेव्हा दिल्लीच्या मुलीला घरतांच्या घरात घेऊन येतो, तेव्हा त्याचीसुद्धा प्रेमासाठी असणारी धडपड ही सगळ्यांनाच आवडते आणि प्रत्येक मुलीला आपल्यालाही असाच मुलगा भेटावा ही इच्छा मनात निर्माण करते. घरात प्रत्येकाचं महत्त्व आणि त्याच्या भावना समजून घेणारी ही गोष्ट आहे. अजिंक्य देव (Ajinkya Deo) आणि अश्विनी भावे (Gharat Ganpati) ही मंडळी तर 25 वर्षांनी एकत्र काम करत आहेत. 


सिनेमा का पाहावा?


एकत्र कुटुंबात राहणाऱ्या किंवा एकत्र कुटुंबात राहून विभक्त झालेल्या प्रत्येकाला ही त्याच्या घरातली गोष्ट वाटते. दोन्ही भावंडांचा मी पणा, जाऊबाईंचा मीच कशी सगळं करते, हे दाखवणारा अहंकार, आताच्या पिढीला नात्यांविषयी असलेली ओढ, आत्याचा माहेरावर असलेला हक्क आणि आज्जी आजोबांना उरलेलं आयुष्य एकत्र कुटुंबात घालवण्याची इच्छा अशी ही घरतांची गोष्ट आहे. घरात आपल्या वडिलधारी माणसं का असावीत याची जाणीव प्रकर्षाने करुन देणारा हा सिनेमा आहे. आताची पिढी ही त्यांना पडणारे प्रश्न अगदी विचारु शकते, पैशांच्या पाठी धावताना विसाव्याच्या क्षणी लागणारी नाती कशी दुरावतात ते या सिनेमाने सांगितलं आहे. त्यामुळे कुटुंबाने कुटुंबासाठी पाहावा असा हा सिनेमा आहे. 


या सिनेमाला देतेय साडेतीन स्टार्स