Genelia Deshmukh reaction on Bigg Boss Season 5 :  बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्राचे प्रेक्षक एका रिऍलिटी शोची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचव्या सिजनबाबत चॅनलकडून एक महत्त्वाची अपडेट देण्यात आलीये. या शोची तारीख जरी जाहीर करण्यात आली नसली तरीही या कार्यक्रमाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या यंदाच्या सीजनचं होस्टिंग हे अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) करणार आहे. त्यानंतर आता जेनिलिया देशमुखचीही (Genelia Deshmukh) प्रतिक्रिया समोर आली आहे. 


बिग बॉस मराठीसंदर्भात अनेक दिवसांपासून चर्चा होती. त्यातच आता कार्यक्रमाची पहिली झलक समोर आल्यामुळे प्रेक्षकांची देखील उत्सुकता शिगेला पोहचली आहे. बिग बॉसच्या पहिल्या चार सिजनचे सूत्रसंचालन दिग्दर्शक निर्माते महेश मांजरेकर यांनी केलं होतं. पण यंदा ही धुरा रितेश देशमुख सांभाळणार असल्याने चाहत्यांना सुरुवातीलाच मोठं सरप्राईज मिळालं आहे.


जेनिलिया देशमुखची प्रतिक्रिया समोर


रितेशच्या प्रोमोचा व्हिडिओ जेनिलियानेही तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन शेअर केलाय. त्यावर जेनिलियाने Can't Wait असं कॅप्शन लिहिलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांप्रमाणेच जेनिलिया देखील बिग बॉसच्या सीजनसाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या सोशल मीडियावर जेनिलियाच्या पोस्टची बरीच चर्चा सुरु आहे.




महाराष्ट्रात पुन्हा घुमणार बिग बॉसचा आवाज


हिंदीमधल्या अफाट यशानंतर 'बिग बॉस' हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला. “बिग बॉस मराठी”चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचला. प्रेक्षक या कार्यक्रमावर बेहद फिदा झाले. “बिग बॉस मराठी” च्या पहिल्या चार सिझनने मराठी प्रेक्षकांची तुफान मने जिंकली आणि मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिझनची जोरदार चर्चा झाली. आता त्याच 'बिग बॅास' मराठीच्या नव्या सिझनची जोरात तयारी सुरू झालीय. 


'बिग बॅास'चे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये 'बिग बॅास'च्या या घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.


ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi 5 : लयभारी! 'बिग बॉस मराठी'बाबत मोठी अपडेट समोर; महेश मांजरेकर नव्हे तर रितेश देशमुख करणार होस्टिंग