First AI Use Indian Cinema : दिग्गज गायक एआर रहेमान (AR Rahman) रजनीकांत (Rajnikanth) यांच्या 'लाल सलाम' या सिनेमातील दिवंगत गायकांचा आवाज बनवण्यासाठी एआयचा वापर केलाय. रहेमान यांनी याबाबत बोलताना म्हटले की, हा एक प्रयोग आहे. यामध्ये मला 70 टक्के यश आले आहे. ज्या गायकांच्या आवाजाचा वापर करण्यात आला त्यांच्या कुटुंबियांशी देखील परवानगी घेण्यात आली असल्याचे रहेमान यांनी स्पष्ट केले आहे. 


एका मुलाखतीमध्ये रहेमान यांना विचारण्यात आले की, एआयच्या वापर करण्याचा विचार कसा सुचला? या प्रश्नाला उत्तर देताना रहेमान म्हणाले, "मला वाटते की बरेचसे लोक टीकटॉक आणि इन्स्टाग्रामवर क्लीप शेअर करत आहेत. मला ते फार आवडत होते. माझ्या मदतीसाठी नेहमी हजर असणाऱ्या माझ्या एका सहकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. त्याने आणि मी मिळून आवाजाने परिक्षण देखील केले. त्याने निधन झालेल्या गायकांच्या आवाजाचा एक नमूना मला पाठवला. लाल सलाम या सिनेमाची दिग्दर्शक ऐश्वर्या या आवाजाच्या शोधात होती. मला वाटले की, हा आवाज चांगला आहे."


रहेमान म्हणाले की, मी निधन झालेल्या या गायकांच्या कुटुंबियांशी बातचित करुन याबाबत परवानगी मागितली. मला वाटतय की, भविष्यात त्यांची मला मदत होईल. पुढे बोलताना ते म्हणाले की, गाणी आणि धुन रेकॉर्ड करण्यासाठी मी त्यांची परवानगी मागितली असून त्यांना या गाण्यांसाठी त्यांच्या अधिकारांची किंमत देखील देणार असल्याचे सांगितले आहे. मी सर्वांशी स्पष्टपणे बोललो आहे, त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. 


दिवंगत गायकांचे कुटुंबिय रहेमान यांच्याशी बोलताना म्हणाले की, "आम्हाला फार आनंद होतोय की, आमच्या वडिलांच्या आठवणी कोणीतरी पु्न्हा एकदा जागवत आहे. त्याच्याबदल्यात आम्हाला किंमतही मिळणार आहे." पुढे बोलताना एआर रहेमान म्हणाले, "मी वैधपणे पुढे जाण्याचे ठरवले. त्यांच्या कुटुंबियांकडे जाण्याची ही चांगली संधी होती."