Famous actress death: फ्रान्समधील दिग्गज अभिनेत्री ब्रिजिट बार्डोट ( Brigitte Bardot) यांचं वयाच्या 91व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे फ्रेंच चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण फ्रान्समधील त्यांच्याच घरात त्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
1950 च्या दशकात ब्रिजिट बार्डोट यांनी फ्रेंच सिनेमात एक नवं पर्व सुरू केलं होतं. आपल्या करिअरमध्ये त्यांनी 50हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. 1956 मध्ये प्रदर्शित झालेला ‘एंड गॉड क्रिएटेड वुमन’ हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरला. मात्र, करिअरच्या शिखरावर असतानाच 1973 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीतून अचानक संन्यास घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. चित्रपटांपासून दूर गेल्यानंतर ब्रिजिट बार्डोट यांनी आपलं संपूर्ण आयुष्य प्राण्यांसाठी वाहून घेतलं. त्यांच्या निधनानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी श्रद्धांजली अर्पण करत त्यांना ‘या शतकातील एक महान व्यक्तिमत्त्व’ असं संबोधलंय.
श्रीमंत कुटुंबात जन्म, एका चित्रपटामुळे जागतिक ओळख
1934 साली पॅरिसमध्ये एका श्रीमंत कुटुंबात ब्रिजिट बार्डोट यांचा जन्म झाला. कुटुंबाची इच्छा होती की त्यांनी बॅले डान्सर व्हावं, मात्र नशिबाने त्यांना अभिनयाच्या जगात आणलं. किशोरवयातच त्या ‘एली’ मॅगझिनच्या कव्हरवर झळकल्या आणि देशभरात चर्चेचा विषय ठरल्या. ‘एंड गॉड क्रिएटेड वुमन’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली लैंगिकदृष्ट्या स्वतंत्र स्त्रीची भूमिका त्या काळात प्रचंड वादग्रस्त ठरली. चित्रपटावर टीकेचा झोड उठवली गेली. अमेरिकेतील काही राज्यांमध्ये त्यावर बंदीही घालण्यात आली होती.
वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत
ब्रिजिट बार्डोट केवळ अभिनयामुळेच नव्हे, तर त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळेही सतत चर्चेत राहिल्या.समलैंगिकांविरोधातील आणि स्थलांतरितांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर अनेकदा टीका झाली. वांशिक द्वेष पसरवल्याच्या आरोपाखाली त्यांना अनेक वेळा दंड ठोठावण्यात आला होता. 2008 मध्ये त्यांच्या एका वक्तव्यानंतर त्यांच्यावर 15000 युरोचा दंडही लावण्यात आला होता. तसेच 2003 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ए क्राय इन द सायलेंस’ या पुस्तकामुळेही त्या वादात सापडल्या होत्या.
खाजगी आयुष्यही कायम चर्चेत
ब्रिजिट बार्डोट यांचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच गाजलेलं होतं. त्यांनी चार लग्न केली आणि त्यांच्या आयुष्यात 17 प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं जातं. एका मुलाखतीत त्यांनी स्वतः कबूल केलं होतं की, ‘नात्यातील आकर्षण कमी झालं की मी पुढे निघून जायचे. मी नेहमीच एक्स्ट्रीम भावनांच्या शोधात होते.’ फ्रेंच सिनेमाची आयकॉन, वादग्रस्त वक्तव्यांची मालकीण आणि प्राणीप्रेमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रिजिट बार्डोट यांचं जाणं हे एका युगाच्या अंतासारखं मानलं जात आहे.