मुंबई: हिंदी, गुजराती आणि भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता किरण कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. एबीपी न्यूजशी बोलताना स्वत: किरण कुमार यांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं आहे. लक्षणं नसल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये न ठेवता घरीच ठेवलं आहे. मी ठीक असून काळजी करण्याचं कारण नाही असं किरण कुमार यांनी सांगितलं आहे.

किरण कुमार यांनी एबीपी न्यूजशी फोनवर झालेल्या संवादात म्हटलं की, मुंबईतल्या एका दवाखान्यात काही उपचारासाठी मला जायचं होतं. त्यासाठी माझ्या काही टेस्ट घेतल्या. त्यात कोविड-19 टेस्ट देखील घेतली होती. या टेस्टचा रिपोर्ट 14 मे रोजी आला. त्यात मला कोरोना झाल्याचं समोर आलं, असं त्यांनी सांगितलं.

किरण कुमार यांनी सांगितलं की, मला कोरोना व्हायरसची कुठलीही लक्षणं नाहीत. सर्दी, ताप, खोकला तसंच कुठलंही दुखणं नाही. एसिम्टमॅटिक असल्यामुळं हॉस्पिटला भरती होण्याची गरज पडली नाही. सध्या मी सेल्फ आयसोलेशन मध्ये माझ्या दोन मजली घरात आरामात राहत आहे, असं ते म्हणाले.



माझं घर खूप मोठं आहे. वरच्या मजल्यावर मी सर्व नियमांचे पालन करुन एकटाच राहात आहे. तर खालच्या मजल्यावर माझं कुटुंब राहात आहे. काळजी करण्याचं काहीही कारण नाही, मी ठीक आहे, असं किरण कुमार यांनी सांगितलं आहे. किरण‌ कुमार यांची पुढील कोरोना टेस्ट 26 मे रोजी होणार आहे.



प्रसिद्ध चरित्र अभिनेता जीवन यांचे पुत्र असलेले किरण‌ कुमार यांनी 70 आणि 80 च्या दशकात अनेक सिनेमांमध्ये हिरोच्या रुपात काम केलं. मात्र त्यांना ओळख मिळाली ती खलनायकाच्या भूमिकांनी. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिकेने आपली एक वेगळी ओळख बनवली. त्यांनी हिंदीसह भोजपुरी आणि गुजराती सिनेमांमध्येही काम केलं आहे. काही मालिकांमध्ये देखील किरण कुमार यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.