Famous Actor Karate Master Shihan Hussaini Passes Away: फिल्म इंडस्ट्रीवर (Film Industry) शोककळा पसरली असून एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेते, कराटे मास्टर आणि तिरंदाजीत पारंगत असलेले शिहान हुसैनी (Shihan Hussaini) यांचं निधन झालं आहे. दीर्घकाळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. ब्लड कॅन्सरमुळे (Blood Cancer) त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. चेन्नईतील (Chennai) एका खासगी रुग्णालयात बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कुटुंबीयांनी दिली निधनाची माहिती
शिहान हुसैनी यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी फेसबुक पोस्टमार्फत दिली आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचं पार्थिव चेन्नईतील बेझंट नगर येथील त्यांच्या हाय कमांड निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यांचे विद्यार्थी, चाहते आणि कुटुंबातील सदस्य त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर शिहान हुसैनी यांच्यावर मदुराई येथे अत्यंसंस्कार केले जातील.
शिहान हुसैनी यांना खास अंदाजात वाहिली जाणार श्रद्धांजली
शिहान हुसैनी यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना, प्रशिक्षकांना एक खास विनंती केली आहे. धनुर्विद्या आणि कराटे सादर करुन त्यांना खास पद्धतीनं श्रद्धांजली दिली जावी, अशी त्यांची इच्छा आहे. शिहान हुसैनी सोशल मीडियावर त्यांच्या कर्करोगाच्या प्रवासाची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत होते. तामिळनाडू सरकारनं त्यांच्या उपचारांसाठी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत केली. आपल्या मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांनी वैद्यकीय संशोधनासाठी आपलं शरीर दान करण्याची घोषणा केली होती.
शिहान हुसैनी यांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, त्यानं 1986 मध्ये कमल हासन यांच्या 'पुन्नगाई मन्नन' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर, तो रजनीकांतचा 'वेलाइकरन', हॉलिवूड चित्रपट 'ब्लडस्टोन' आणि तमिळ चित्रपटांच्या इतर अनेक चित्रपटांमध्ये दिसला. विजयच्या 'बद्री' चित्रपटात त्यांनी कराटे प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. त्यांच्या शेवटच्या चित्रपटांमध्ये विजय सेतुपती यांचे 'काठुवाकुला रेंदू कधल' आणि 'चेन्नई सिटी गँगस्टर्स' यांचा समावेश आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, ते अनेक रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणूनही दिसले होते. ते केवळ अभिनेते नव्हते तर मार्शल आर्ट्स, शिल्पकला, युद्ध क्रीडा आणि धनुर्विद्या यांमध्येही तज्ज्ञ होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :