Big Boss Marathi: बिगबॉस मराठीच्या पाचव्या पर्वात विजयाची ट्रॉफी उचलणाऱ्या झापुक झुपूक फेम सुरज चव्हाणचं सोशल मिडियावर एकीकडे कौतूक होतंय तर दुसरीकडं हा सगळा सिंपथी गेम असल्याचं अनेकजण लिहितायत. बारामतीजवळच्या मोढवे गावातला, गरीब घरातला सुरज आता स्टार झालाय. ग्रामीण भागातून त्याला मोठा पाठिंबा मिळालाय. पण अनेकजण केवळ झापुक झुपुक आणि सहानुभूतीच्या जोरावर जिंकल्याचा ठपका त्याच्यावर ठेवताना दिसतायत. यावरून बिगबॉस मराठीचे माजी स्पर्धक किरण माने यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे.


मराठी मनोरंजनाच्या गोऱ्यापान, चकचकीत आणि झगमगत्या विश्वात असा फाटका माणूस लोकांना उपरा वाटतो. टीव्ही रिआलिटी शोच्या शहरी गोऱ्यापान आणि चालाख पोराला ट्रॉफी दिली की बहुतांश लोकांना फारसं आश्चर्य वाटत नाही पण  तेच  गरीब, ओबडधोबड, गावरान भाबड्या पोरानं ट्रॉफी उचलली की लय गदारोळ माजतो. असं म्हणत सुरजला ट्रोल करणाऱ्यांना चोख उत्तर दिलंय. 


गरीबी बघून सहानुभूतीनं ट्रॉफी दिली अशा टिप्पण्या...


'गरीबी बघून सहानुभूतीनं त्याला हे दिलंय', 'त्याला हे यश टिकवताच येणार नाही' अशा टिप्पण्या सुरू होतात. 'आता दारिद्र्य दाखवून रडारडी करा आणि ट्रॉफी मिळवा' अशी हेटाळणी केली जाते. मनोरंजनाच्या गोर्‍यापान, चकचकीत, झगमगीत विश्वात असा फाटका माणूस लोकांना 'उपरा' वाटतो. सुरजविषयी असं नकारात्मक बोललं जातंय त्यामागे हे मूळ कारण असल्याचंही किरण माने यांनी म्हटलंय.


सुरज स्वत:च्या बळावर गेला बिगबॉसच्या घरात...


सुरजला बिग बॉसची ट्रॉफी मिळाल्यानंतर बिग बॉस मराठीचा पूर्व स्पर्धक किरण मानेनं त्याच्या ट्रोलर्सला चांगलंच सुनावलंय. तो म्हणाला, एक विसरू नका भावांनो, सूरज बिग बॉसच्या घरात आला, तेच मुळात संपुर्णपणे स्वत:च्या बळावर ! बिग बॉसच्या ऑफरला सुरूवातीला 'नाही' म्हणणारा तो एकमेव स्पर्धक होता. गाव सोडून तो कधीच कुठे गेला नव्हता. तो इतर स्पर्धकांसारखा पैशानं मजबूत वगैरे नव्हता किंवा मनोरंजन विश्वातलाही नव्हता. अशा पोरानं मिळालेल्या संधीचं सोनं केलंय हे सत्य मान्य करा. 


 






स्वबळावर आलेल्या पिल्लाला कुरूप वेडा ठरवू नका


यश प्रसिद्धी मिळवायला तुमच्याकडे टॅलेंट पाहिजे, अंगी कर्तृत्व पाहिजे. योग्य ती संधी मिळायला पाहिजे. आता हे यश आणि प्रसिद्धी टिकवण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत लागते... ती दाखवली तर तो टिकेलही. किमान आता तरी मराठी इंडस्ट्रीच्या तळ्यात पोहणाऱ्या बदकांमध्ये गावखेड्यातील नितळ- निर्मळपणा घेऊन स्वबळावर आलेल्या पिल्लाला कुरुप वेळा ठरवू नका. कदाचित आतापर्यंतच्या विनोदवीरांच्या परफॉर्मंसला बुक्कीत टेंगुळ आणणारा तो एक राजहंस ठरू शकतो अशी भावूक पोस्ट करत लब्यू सूरज... होऊन जाऊदे झापुक झुपूक ! असं किरण मानेनं लिहिलंय!


हेही वाचा:


big boss 18: गुणरत्न सदावर्तेंच्या शेरेबाजीनं उडला हास्यकल्लोळ, कलर्सनं शेअर केला बिगबॉसच्या घरातील मिश्कील अंदाज