Atul Parchure Funeral: कलाक्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीतील सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. त्यांच्यासोबत काम केलेल्या सहकाऱ्यांसह दिग्गजांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. दादर मधील शिवाजी पार्क हिंदू स्मशानभूमी त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अतुल परचुरे यांचे पार्थिव दाखल होताच अनेकांना अश्रू अनावर झाले होते. कॅन्सरचे कारण झालं आणि आपल्या प्रांजळ अभिनयाने लोकांचा मनाचा ठाव घेणारा अभिनेता अतुल परचुरे याने जगाचा निरोप घेतला. 


रंगभूमीवरचा प्रवेश, मालिकांमधील हळव्या भूमिका आणि सिनेमांमधलं अचूक टाइमिंग साधत अतुल परचुरे हे नाव कलाकार म्हणून प्रेक्षकांचे मनावर कोरल गेलं. त्याच्या प्रत्येक भूमिकेवर  प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. गेला माधव कुणीकडे.. कापूस कोंड्याची गोष्ट.. आणि अगदी व्यक्ती आणि वल्लीपर्यंत त्याची प्रत्येक भूमिका रंगभूमीवर खणखणीत वाजली.


अशोक मामांसह सुचित्रालाही गलबलून आलं 


बालमोहन विद्यामंदिर चे माजी विद्यार्थी असलेल्या अतुल परचुरे यांचे संपूर्ण वास्तव्य हे शिवाजी पार्क परिसरातच राहिलं होतं. शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत त्यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्या जवळचे असणारे कलाकार आप्तेष्ट आणि सहकारीही यावेळी उपस्थित होते. इतकी वर्ष सहवास लाभल्यानंतर अतुल परचुरे यांचं पार्थिव पाहून अशोक मामांसह सुचित्रा बांदेकर, निवेदिता सराफ, मिलिंद जोशी असे कलाक्षेत्रातील अनेक दिग्गजांना गलबलून आले होते. 


कर्करोगाचे कारण झाले..


अतुल परचुरे यांना काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. त्यावर ते जिद्दीने मातही करत होते. मात्र काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी रात्री कर्करोगाच्या कारणानेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या चाहत्यांसह कलाकारांच्या ही मनाला चटका लावून देणारी ही बातमी ठरली.