मुंबई : एनसीबीने अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आणि तस्करीप्रकरणी अनेकांची चौकशी सुरू केली आणि बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या बड्या नावांची नावं यात येऊ लागली. रिया चक्रवर्तीपासून सुरू झालेला हा सिलसिला आता दीपिका, सारा आणि श्रद्धा यांच्यापर्यंत येऊन ठेपलेली आहे. आता दीपिका आणि इतर सर्व कलाकारांचे मोबाईल जप्त झाले आहेत. आता त्याचा तपास एनसीबी करते आहेच. पण केवळ या नावांमुळे आता बड्या आंतरराष्ट्रीय ब्रॅंड्सची गोची झाली आहे.


श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि दीपिका पादुकोण यांची नावं आल्यामुळे त्यांच्या खांद्यावर असलेल्या ब्रॅंडसची गोची झाली आहे. सध्या या सर्व कलाकारांची नावं सध्या काही आरोपांमध्ये डागाळली आहेत. त्यामुळे यांच्या जाहिराती चालवायच्या की नाही यावर अनेक मोठे ब्रॅंड विचार करु लागले आहेत. यात 2019 च्या हवाल्यानुसार एकट्या दीपिकावर तब्बल 19 मोठे ब्रॅंड अवलंबून आहेत. यात ब्रिटानिया, तनिष्क, एक्सिस बॅंक, ओप्पो, विस्तारा एअरलाईन्स आदी ब्रॅंडसचा समावेश होतो. आता या सर्वच ब्रॅंडसची गोची झाली आहे. दीपिकावर या ब्रॅंडस मिळून सध्या 600 कोटी रुपये लागले आहेत. तर श्रद्धा कपूरही अनेक मोठे ब्रॅंड्स बाळगून आहे.


श्रद्धा कपूर ही यूथ आयकॉन म्हणून ओळखली जाते. ती वीट, लिप्टन, लॅक्मे, हेअर एंड केअर, व्हॅसलीन आदी अनेक ब्रॅंड आपल्याकडे बाळगून आहे. यात जवळपास तिच्याकडे 300 कोटीचे ब्रॅंडस असल्याचं कळतं. तर सारा अली खानही अलिकडे आली असली तरी तिच्याकडे चांगले ब्रॅंड्स आहेत. कारण, सारा अली खान ही सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी असल्यामुळे तिच्याकडे असलेलं वलय पाहता प्रॉमिसिंग चेहरा म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. साराकडेही अनेक चांगले ब्रॅंडस आहेत. यात शीतपेयं, शुज, पेन, सौंदर्यप्रसाधने यांचा सहभाग होतो.


आता या तीन कलाकारांची नावं यात आल्याने या ब्रॅंड्सनी आपल्या या कलाकारांच्या जाहिराती तूर्त थांबवायचा निर्णय घेतला आहे. लोकांच्या मनात या कलाकारांमध्ये सध्या असलेला रोष लक्षात घेता या जाहिराती दाखवून आणखी नुकसान न ओढवता मध्यममार्ग काढण्यावर सध्या या कंपन्या विचार करु लागल्या आहेत. यावर बोलताना जाहिरात संस्थेत काम करणारी स्मृती शर्मा म्हणाली, 'कंपन्यानी जाहिराती थांबवणं हे स्वाभाविक आहे. कारण, हे त्या त्या ब्रॅंडचे दूत असतात. त्यांची इमेज डागाळली तर ब्रॅंड याचा विचार करतात. आमीर खाननेही काही वर्षांपूर्वी भारतात राहणं योग्य नसल्याचं विधान केल्यावर एका मोठ्या ग्राहक कंपनीने आमीरच्या जाहिराती थांबवल्या होत्या. उद्या कदाचित यातून हे कलाकार सहीसलामत सुटले तर उद्या या जाहिराती पुन्हा सुरू होतील. जर यातल्या काही कलाकार यात दोषी आढळल्या तर मात्र त्यांना मोठं नुकसान भोगावं लागेल.'